ऊर्जामंत्र्यांचे नागपूर आघाडीवर, कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर
वीज बचतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने राज्यातील महावितरणच्या १ कोटी ६९ लाख घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात आतापर्यंत १ कोटी ५५ लाख ‘एलईडी दिव्यां’ची विक्री झाली असून, त्याचा झगमगाटाने राज्यातील घरे उजळली आहेत. यात ऊर्जामंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्य़ाने बाजी मारली असून, राज्यात सर्वाधिक १३ लाख १० हजार दिवे वितरित करण्यात आले आहेत.
सीएफएल किंवा आयसीएल बल्बच्या तुलतेन एलईडी दिव्यांमुळे ८० टक्के वीज बचत होऊ शकते, त्यामुळे संपूर्ण देशात या दिव्यांच्या वापरासंदर्भात जनजागृती करण्यासह सवलतीच्या दरात त्याचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने पुढाकार घेतला. त्यामुळे महावितरणच्या घरगुती ग्राहकांना एलईडी दिवे वितरणाची योजना ऑक्टोबर २०१५ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. महावितरणचे राज्यात १ कोटी ६९ लाख ६२ हजार ६५३ घरगुती ग्राहक असून, एकूण ग्राहक संख्येच्या ७३.६४ टक्के त्यांचा सहभाग आहे. ८० टक्के वीज बचत होण्यासाठी राज्यातील महावितरणच्या घरगुती ग्राहकांना प्रतिग्राहक १० दिव्यांप्रमाणे वितरण होत आहे. केंद्र शासनाचे ऊर्जा मंत्रालय, महाराष्ट्र शासन, महावितरण व एनर्जी इफिशिएंसी सर्विसेस लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. २१ एप्रिल २०१६ ला सकाळी ११.३० वाजेपर्यंत राज्यात १ कोटी ५५ लाख ६० हजार ५५५ ‘एलईडी दिवे’ वितरित करण्यात आले. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्य़ाने या योजनेचा लाभ घेण्यात राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तेथे सर्वाधिक १३ लाख १० हजार ५१४ दिवे, त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्य़ात ८ लाख ९५ हजार २३५ व तिसऱ्या क्रमांकावर अमरावती जिल्ह्य़ात ८ लाख २० हजार २५१ दिवे वितरित करण्यात आले. अकोला जिल्ह्य़ात ६ लाख ४५ हजार २३९ दिव्यांची विक्री करण्यात आली आहे. टप्याटप्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात ही योजना सुरू करण्यात आली होती. उस्मानाबादमध्ये ग्राहकांनी सर्वात कमी ७ हजार २५० एलईडी दिवे घेतले आहेत. एलईडी बल्ब वितरणची व्यवस्था राज्यातील महावितरणच्या कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.

८५ रुपयात दिवा
विविध कंपन्या बाजारात या दिव्यांेची अव्वाच्या सव्वा दरात विक्री करीत आहेत. ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत, हे लक्षात घेऊन ४०० रुपयांचा एलईडी दिवा ग्राहकांना सवलतीत १०० रुपये दराने देण्यास सुरुवात करण्यात आली होती. आता तर त्याची किंमत आणखी कमी करून ८५ रुपयेच करण्यात येत आहे. प्रत्येक वीज ग्राहकाला त्यांचे वीज देयके दाखवून सुलभ हप्त्यातही हे एलईडी बल्ब खरेदी करता येतात. प्रतिबल्ब १० रुपये भरून उर्वरित रक्कम वीज देयकात १० हप्यात भरण्याची सुविधाही महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.