मनुष्यबळ, वेळ व खर्चातही बचत; ‘एसपी’ कार्यालयही ‘पेपरलेस’ होणार

नगर : जिल्हा पोलिस दलामध्ये ‘ई—टपाल कार्यप्रणाली’ यशस्वीरीत्या राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून गेल्या पाच महिन्यात २ लाख २३ हजार ५४८ टपालांपैकी १ लाख ८८ हजार ४६ प्रकरणे निकाली काढणे त्यामुळे शक्य झाले आहे. या कार्यप्रणालीमुळे दफतर दिरंगाई कमी होऊन मनुष्यबळातही बचत होऊ लागली आहे. आता लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ‘पेपरलेस’ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती दिली. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अगरवाल, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनील कटके, ‘ऑपरेशन मुस्कान’चे पोलीस निरीक्षक मसूद खान, सायबर क्राईम सेलचे उपनिरीक्षक प्रतीक कोळी आदी उपस्थित होते.

‘ई—टपाल सेवा’ कार्यप्रणाली सन २०१७ मध्येच जिल्ह्यसाठी लागू करण्यात आली होती, मात्र त्या वेळी ती कार्यान्वित करण्यात आली नाही. गेल्या फेब्रुवारीपासून ती राबवण्यास सुरुवात करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस उपअधीक्षक कार्यालय व पोलिस ठाणे अशा तिन्हीस्तरांवर कार्यप्रणाली राबवली जात आहे. पोलिस कर्मचारीही या कार्यप्रणालीचा वापर करू लागले आहेत. प्रकरणे विहित मुदतीत निकाली न काढली गेल्यास या कार्यप्रणालीमधून स्वयंचलितरीत्या संबंधित अधिकारी किंवा पोलिसांना नोटिसा जारी केल्या जातात, मात्र अद्याप या नोटीस यांच्या आधारे कोणावर कारवाई करण्यात आलेली नाही.

पाटील यापूर्वी सोलापूरचे पोलिस अधीक्षक असताना तेथे त्यांनी ही कार्यप्रणाली यशस्वीपणे राबवली होती. लोकसेवा अधिनियमाद्वारे पारपत्र, सशुल्क बंदोबस्त, चारित्र्य पडताळणी, विविध प्रकारचे परवाने विहित मुदतीत देणे बंधनकारक ठरते. यासाठी या कार्यप्रणालीद्वारे गेल्या सात महिन्यात १७ हजार ८६४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातील मुदतीपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहिलेली केवळ ७ प्रकरणे आहेत.

सुमारे एक हजार अर्ज गहाळ

ई—टपाल कार्यप्रणाली कार्यान्वित केल्यानंतर गेल्या वर्षभरात सुमारे १ हजार अर्ज गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा अर्जदाराशी संपर्क करून त्याआधारे प्रत घेऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्ज प्रलंबित राहिल्यामुळे ८० जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. ई— टपालमुळे दफ्तर दिरंगाई कायद्यातील मुदतीपेक्षा लवकर प्रकरणे निकाली निघू लागली आहेत, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

ई—टपाल कार्यप्रणालीचे फायदे

ई—टपाल कार्यप्रणालीमुळे टपाल गहाळ होत नाही. कामकाज सुटसुटीत व पारदर्शी होऊन ताणतणाव कमी होतो. ट्रेकिंग सिस्टीममुळे टपाल कोणत्या टप्प्यावर प्रलंबित आहे हे समजते. सद्यस्थिती समजल्याने दप्तर दिरंगाई टाळता येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही दैनंदिन आढावा घेऊन प्रशासनात कार्यक्षमता निर्माण करण्यास मदत होते. कोण प्रामाणिक काम करतो व कोण कामचुकारपणा करतो यामध्ये फरक दिसतो. पारदर्शकतेमुळे नागरिकांचे कटू प्रसंग कमी होतात. सरकारी खर्चातही बचत होते. नागरिकांनाही जलद सेवा मिळते.