मांजरा नदीच्या खोलीकरणासाठी दिवसभरात एक कोटी ९३ लाखांचा निधी जमा; साडेसात कोटी खर्च अपेक्षित
उग्र रूप धारण करीत असलेल्या आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बनलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लातूरकरांनी लोकसहभागातून मांजरा नदीचे १८ किलोमीटर खोलीकरण करण्याचा संकल्प शुक्रवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोडला. नदीच्या सखोलीकरणाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवातही झाली आणि अवघ्या दिवसभरात तब्बल एक कोटी ९३ लाख रुपयांचा निधीही जमा झाला! या सखोलीकरणासाठी साडेसात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, नाम फाऊंडेशन या संघटनांनी या कामी पुढाकार घेतला व पाहता पाहता अनेक संघटना या योजनेत सहभागी झाल्या. सरकारवर अवलंबून न राहता हे संपूर्ण काम लोकसहभागातून करण्याचा संकल्प सोडून प्रत्यक्ष कामास प्रारंभही झाला. दहा पोकलेन मशीनच्या साह्य़ाने साई बंधारा १८ किलोमीटर लांब, ८० मीटर रुंद व ३ मीटर खोल करण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
या खोलीकरणामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात १८ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता निर्माण होईल. ४३ दशलक्ष घनमीटर गाळ निघेल. दोन महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. नदीला मिळणारे नालेही खोल केले जाणार आहेत.
या कामासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने एक कोटी, इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर शाखेने ५१ लाख रुपये तर जनकल्याण समितीने ११ लाख ११ हजार ११ रुपये दिले. जनकल्याण समिती टप्प्याटप्प्याने आणखीही निधी देणार आहे. कंत्राटदार संघटनाही ११ लाख रुपये देणगी देणार आहे. विविध पत्रकारांनीही २१ हजार रुपयांचा निधी घोषित केला.
अन्य काही देणगीदारांमध्ये सिद्धेश्वर देवस्थान (१ लाख ५१ हजार), राज मोटर्सचे अनिल िशदे (१ लाख ५१ हजार), बी. बी. ठोंबरे (१ लाख ५१ हजार), दिलीप माने (१ लाख ११ हजार), सनरिचचे बालकिशन मुंदडा (१ लाख), विलास चामे (१ लाख), अभाविप विवेकानंद संस्कार संस्था (१ लाख), ज्ञानेश्वर विद्यालय (१ लाख), भाई उद्धवराव पाटील प्रतिष्ठान (५१ हजार), राजस्थान विद्यालय १९७८ची बॅच (५१ हजार), विशाल अग्रवाल (५१ हजार), शिवशंकर लातुरे (२५ हजार), अ‍ॅड. मनोहरराव गोमारे (११ हजार) यांचा समावेश आहे. हे काम संपेपर्यंत एक मशीन सरकारतर्फे दिले जाणार असून महसूल कर्मचारी संघटनेतर्फे एक दिवसाचा पगार दिला जाईल, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जाहीर केले.