महसूलमंत्री खडसे यांची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच मंडळी लातूर शहराच्या पाणीटंचाईबाबत लक्ष घालत असून, राज्य सरकार या बाबत गंभीर आहे. लातूरकरांना चार दिवसांनंतर दररोज १ कोटी लीटर पाणी उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती महसूल, तसेच मदत व पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
खडसे शुक्रवारी लातूरच्या दौऱ्यावर आले होते. औसा तालुक्यातील मातोळा ही दहाखेडी पाणीपुरवठा योजना त्यांनी दुपारी १ वाजता नव्याने सुरू केली. त्याचे उद्घाटन बेलकुंड जलकुंभावर खडसे यांच्या हस्ते झाले. ही योजना सुरू करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून नागपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी काम करीत होते. या कामाची माहिती कोणालाही देण्यात आली नव्हती. या योजनेचे रोहित्र व पंप नादुरुस्त झाले होते. ते नव्याने बसवण्यात आले.
निम्नतेरणा प्रकल्पातून दररोज ५० लाख लटर पाणी लातूरला उपलब्ध होणार आहे. हे पाणी थोडय़ाच दिवसांत बेलकुंडहून लातूपर्यंत बंद वाहिनीद्वारे २० लाख लीटर आणले जाईल व ३० लाख लीटर पाणी टँकरद्वारे उचलले जाणार आहे. सध्या डोंगरगाव येथून रोज २५ लाख लीटर, भंडारवाडी येथून ६ लाख लीटर, साई येथून २ लाख लीटर व सोमवारपासून रेल्वेने दररोज २५ लाख लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लातूरकरांना १ कोटी लीटर पाणी दररोज उपलब्ध होणार असून, पावसाळय़ापर्यंत यात खंड पडणार नसल्याचे खडसे यांनी सांगितले.
रेल्वेने पाणी देण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मोठी भूमिका बजावली असून, अतिशय कमी पसे राज्य सरकारला यावर खर्च करावे लागणार आहेत. लातूरला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असून लातूरचा पाणीप्रश्न कायमचा सोडवण्याचा शब्द आपण पाळणार असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण मराठवाडय़ात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. २ हजार ८५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ५ हजार ९४४ िवधनविहिरी अधिग्रहित केल्या आहेत. ३५६ चारा छावण्या सुरू असून याची संख्या ३७३पर्यंत पोहोचेल. सध्या ३ लाख ७२ हजार ८८१ जनावरे या छावणीत आहेत. गरज पडल्यास बाहेरच्या जिल्हय़ातून चारा उपलब्ध केला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मराठवाडय़ात दुष्काळाचे संकट निवारण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे सांगतानाच लातूर शहरातील पाणी वितरणातील दोष दूर करण्यासाठी महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.