माणगाव दत्तमंदिरजवळील डॉ. जवरे यांच्या घरासमोरील रस्त्यावर सोनुर्ली ते  सावंतवाडी अशा शालेय विद्यार्थ्यांना घेऊन सावंतवाडीत येणाऱ्या बसचालकाने ब्रेक लावताच बस गटारात कलंडली. या अपघातात हायस्कूलला जाणारा शालेय विद्यार्थी शुभम भगवान कुंभार (१६) हा क्लीनर साइडच्या मागच्या चाकाखाली सापडून ठार झाला, तसेच सकाळी मॉर्निग वॉक करून परतणाऱ्या चार जणांना गंभीर दुखापती झाल्या. सुदैवाने बसमधील विद्यार्थ्यांसह ५० प्रवासी बालंबाल बचावले. या अपघातामुळे वातावरण तापून धक्काबुक्की होण्याचा प्रकार घडला.
या अपघातात शुभम कुंभार, रा. माणगाव, मूळचा पन्हाळा, जि. कोल्हापूर हा १६ वर्षांचा शालेय विद्यार्थी ठार झाला. त्याला बाहेर काढण्यास अवधी लागल्याने तो जागीच ठार झाला. आरपीडी हायस्कूलमध्ये ११ वीत प्रथम क्रमांक प्राप्त केलेला हा विद्यार्थी १२ वीत शिक्षण घेत होता. तो अत्यंत हुशार होता.
शुभम कुंभार हा विद्यार्थी चालत हायस्कूलमध्ये येत होता. त्याच्यापुढे सकाळीच मॉर्निग वॉकला गेलेले प्रवीण कुडतरकर, वासुदेव शिरोडकर, विजय बिरोडकर, राऊळ हे चालत घरी परतत होते. ते या अपघातात सापडले आणि सुदैवाने बचावले. ते गटारात पडले. त्यात प्रवीण कुडतरकर यांचा हात व वासुदेव शिरोडकर यांच्या कंबरेसह सर्वागाला दुखापती झाल्या. कुडतरकर यांना केईलीमध्ये हलविण्यात आले. विजय बिरोडकर, राऊळ यांना किरकोळ दुखापती झाल्या.
उपजिल्हा रुग्णालयात डॉ. श्रेयश मांगेलकर, डॉ. सावंत यांनी सर्वाना तपासून एक्स-रे काढले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक उमेश हजारे, उपनिरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी जाऊन तपास केला.