मुंबई : राज्य सरकारने आधी जाहीर केल्याप्रमाणे ७२ हजार पदांची नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली असून दोन वर्षांत दीड लाख पदे भरण्यात येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, नोकरभरतीसाठी पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहेत. सायबर कॅफेचा वापर त्यासाठी करायचा नाही, असा स्पष्ट निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत १९ विभागांच्या ६४ विविध श्रेणींमधील पदांसाठी ३२ लाख अर्ज आले असून त्यापैकी १२ लाख जणांची ऑनलाइन परीक्षाही झाली आहे. तसेच ४९०० जणांच्या नियुक्तीची प्रक्रियाही पार पडली आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. त्याचबरोबर या ७२ हजार जागांबरोबरच एकूण दीड लाख पदे दोन वर्षांत भरण्यात येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जमाफीच्या निर्णयानुसार राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना एकूण २४ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पैकी ४३ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार कोटी रुपये खात्यात जमा करण्यात आले असून साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेपाच हजार कोटी रुपये लवकरच मिळतील. त्याचबरोबर तांत्रिक गोष्टींमुळे कर्जमाफी न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्यात येणार असून त्यासाठी सुमारे सहा-सात हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

जलयुक्त शिवारवरील टीकेचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. योजनेतून पाणीसाठा झाल्यानेच कमी पाऊस पडूनही सोयाबिनची उत्पादकता १६ टक्क्यांनी तर कापसाची उत्पादकता १७ टक्क्यांनी वाढली. पावसावरील अवलंबित्व कमी करून संरक्षित सिंचनव्यवस्था उभी केल्यानेच हे शक्य झाले. ज्या गावात ही योजना झाली तेथे त्यांच्या गरजेचे वर्षभराचे पिण्याचे पाणी व शेतीसाठीचे पाणी उपलब्ध व्हावे हा हेतू आहे. त्यालाच आपण दुष्काळमुक्ती म्हणतो, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात एक लाख ६१ हजार शेततळी पूर्ण केली असून त्यासाठी ९५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. या योजनेतून गावतळे बांधण्याचा सरकारचा मानसही फडणवीस यांनी व्यक्त केला.

पीक विमा कंपन्यांनी मागील वर्षी शेतकऱ्यांकडून ४६८ कोटी रुपयांचा हप्ता व सरकारचा वाटा तीन हजार कोटी असे एकूण ३४६८ कोटी रुपयांतून शेतमालाचा विमा उतरवला होता. पैकी भरपाईपोटी ३४२५ कोटी रुपये त्यांना शेतकऱ्यांना द्यावे लागले, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

मराठवाडा नदीजोडच्या निविदा लवकरच

पाण्यासाठी मराठवाडय़ातील जलस्रोतांना एकमेकांशी जोडण्यासाठीच्या प्रकल्पाचे (मराठवाडा वॉटर ग्रिड) अहवाल येण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्व कामांच्या निविदा काढण्यात येतील, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

उसळीत चिकन आढळल्याप्रकरणी कारवाईची ग्वाही

मुंबई : विधानभवनाच्या उपाहारगृहात उसळीत चिकनचा तुकडा आणि नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाच्या जेवणाच्या डब्यात शेण आढळण्याच्या घटना गंभीर असून या दोन्ही प्रकरणात जबाबदार लोकांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. विधानभवनाच्या उपाहारगृहात मटकीच्या उसळीमध्ये बुधवारी चिकनचा तुकडा आढळला  होता. अजित पवार यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्याचवेळी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णाच्या जेवणाच्या डब्यात शेण आढळून आल्याची बाब विजय वडेट्टीवार यांनी स्थगन सूचनेच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणली. त्यावर या प्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.