पालघर : पालघर नगरपरिषदेच्या २४ मार्च रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपल्या अस्तित्वासाठी निवडणुकीच्या घोषणेपासून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंत पैशाचा पाऊस पाडला. या निवडणुकीत सुमारे आठ ते दहा कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती हाती आली असून पैसे वाटताना एका प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच वेगवेगळ्या प्रभागांमध्ये खाण्यापिण्याच्या मेजवान्या सुरू झाल्या होत्या. काही अपक्ष उमेदवारांना मागे घेण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले गेल्याचेही बोलले जात आहे. प्रभागात आपल्या मतदारांना तसेच विशेष करून तरुणांना खूश ठेवण्यासाठी ओल्या व सुक्या मेजवान्यांचे आयोजन राजरोसपणे करण्यात आले.

निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात अनेक प्रभागांमध्ये मतांसाठी रोख रक्कम देण्याची हमी अनेक उमेदवारांनी दिली होती. सुशिक्षित भागात काही मतदारांनी रोख रकमेसह इमारतीच्या डागडुजीसाठी किंवा इतर खर्चासाठी रक्कम स्वीकारल्याची माहितीही देण्यात येत आहे. मतदानाच्या पूर्वी दोन दिवस मतासाठी एक हजार ते पाच हजार रुपये इतकी रक्कम रोखीने ठिकठिकाणी वाटण्यात आली.

त्याचप्रमाणे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची सोय व बूथवर बसणाऱ्या व्यक्तीस त्याच्या श्रमाचा मोबदला अशा पद्धतीने मोठी रक्कम खर्च करण्यात आली आहे.

अनेक प्रभागांमध्ये मतदारांनी वेगवेगळ्या उमेदवारांकडून रोख रक्कम स्वीकारली असली तरी त्यांनी आपल्याला भावेल अशाच उमेदवाराला प्रत्यक्षात मतदान केल्याने मतदार हा निवडणूक प्रक्रियेत ‘राजा’ असतो हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

दरम्यान, निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन होईल याकरिता पथके निर्माण करण्यात आली होती. पथकांनी निवडणूक काळात अनेक ठिकाणी व दुर्गम भागांमध्ये फेऱ्या मारल्या मात्र एक प्रकार वगळता त्यांच्या हातात कोणीही कार्यकर्ता पैसे वाटताना सापडू शकला नाही.

पालघर नगरपरिषद निवडणूकपाठोपाठ लोकसभेची निवडणूक महिन्याभरावर येऊन ठेपली असताना ज्या मतदारांना मतासाठी भरघोस रक्कम रोखीने घेण्याची सवय झाली आहे ती मंडळी विना पैसे मतदानासाठी लोकसभेच्या निवडणुकीत कसे काय बाहेर पडतील? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रत्येक प्रभागासाठी ४० लाख 

शिवसेना व भाजप युतीने प्रत्येक प्रभागासाठी किमान चाळीस लाख रुपये वितरित केल्याचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने १५ लाख रुपये त्यांच्या उमेदवारांसाठी खर्च केल्याचे सांगण्यात येते. अनेक उमेदवारांनी आपल्या ऐपतीप्रमाणे दहा लाखांपासून चाळीस लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा वैयक्तिक खर्च केल्याचे सांगण्यात येते.  निवडणुकीत २९ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. अपक्ष उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी आपल्याला मतदान करावे म्हणून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांकडूनदेखील आमिष दाखवण्यात आली.