पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबातील तिहेरी निर्घृण हत्याकांडातील तिसरा आरोपी तथा मृताचा थोरला भाऊ दिलीप जगन्नाथ जाधव याला न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्याचा एक मुलगा व दुसरा आरोपी अशोक यालाही न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
जवखेडे येथे दि. १९ ऑक्टोबरला संजय जगन्नाथ जाधव यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा अशा तिघांचा निर्घृण खून झाला होता. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री राहुरी तालुक्यातील वांबोरी येथून मृताचा थोरला भाऊ दिलीप याला अटक केली. शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायदंडाधिकारी विजय चौघुले यांनी त्याला १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्याची दोन मुले प्रशांत व अशोक यांना या हत्याकांडप्रकरणी पूर्वीच अटक करण्यात आली आहे. यातील अशोकच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपत होती. त्यामुळे त्यालाही पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता त्याला न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
या हत्याकांडप्रकरणी अटकेतील आरोपींची संख्या आता तीन झाली असून, दिलीप याचा मुलगा प्रशांत यानेच या प्रकरणी फिर्याद दिली होती. पुढे तोच आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये मृताचा भाऊ दिलीप व त्याच्या दोन मुलांचा समावेश आहे. प्रशांत आणि अशोक या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिलीपला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.