सोलापूर-हैदराबाद महामार्गावर सोलापूरपासून सुमारे १२० किलो मीटर अंतरावर कर्नाटकात हुमणाबाद येथे तवेरा मोटार व टँकर याची समोरासमोर धडक बसून घडलेल्या भीषण अपघातात तवेरा गाडीतील दोन कुटंबीयांतील दहाजण मृत्युमुखी पडले. रविवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातातील सर्व मृत हे कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या पन्हाळा तालुक्यातील शहापूरचे रहिवासी आहेत.
हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीसह अन्य पर्यटनस्थळे पाहण्यासाठी शहापूरचे महिपती शेटे व त्यांचे नातेवाईक शामराव शंकरराव जाथध हे आपल्या कुटुंबीयांसह तवेरा गाडीने निघाले असता वाटेत त्यांच्यावर काळाने झडप घातली. यातील नऊजण जागीच ठार झाले, तर एका मुलीचा जखमी अवस्थेत सोलापूरकडे आणत असताना वाटेत अंत झाला. या अपघातात महिपती ज्ञानेश्वर शेटे (वय ६०), शहाजी बळवंत शेटे (वय ३४), अर्चना विजय शेटे (वय ३२), त्यांचे पती विजय जयवंत शेटे (वय ३८), मुलगा अभिषेक विजय शेटे (वय ८) व मुलगी वैष्णवी (वय ६) असे संपूर्ण कुटुंबच अपघातात बळी पडले. याशिवाय कुसुम शामराव जाधव (वय ५०) व त्यांचे पती शामराव शंकरराव जाधव (वय ५५) यांच्यासह लखन अशोक चव्हाण (वय २२) व विश्वास नारायण (वय ४२) यांनाही काळाने हिरावून घेतले.
हे सर्वजण हैदराबादच्या सहलीसाठी तवेरा गाडीतून (एमएच १२ व्हीएन १८३३) सोलापूरकडे निघाले होते. रात्रभर प्रवास करीत ही गाडी कर्नाटकात हुमनाबाद येथे आरटीओ तपासणी नाक्याजवळ आली असता पुढे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तवेरा गाडीला समोरून खाद्यतेल वाहून निघालेल्या टँकरची (एचएच ०४ सीए ७१४९) जोरदार धडक बसली आणि हा भीषण अपघात होऊन त्याठिकाणी मोठा हाहाकार उडाला. स्थानिक तरूणांसह हुमनाबाद पोलिसांनी मदतकार्य केले.