पारनेर  : भाजपाची मनमानी चालू देणार नाही, भलेही तुमचे सव्वाशे आमदार आले असतील. भाजपाच्या दृष्टीने हा इतिहासातील शेवटचा आकडा असेल. राज्यात अनेक पक्ष आले व गेले. काही छत्र्या पावसात उगवल्या आणि बंद झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीने  दलाल निर्माण केले, तर बाळासाहेबांनी स्वाभिमानी कार्यकर्ता तयार केला असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.  राज्यात शिवशाही आणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे असेल, तर नगर जिल्हयातून शिवसेनेचे दहा आमदार विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या प्रशिक्षण शिबिरात खा. राऊत यांनी मार्गदशर्न केले. या वेळी मंत्री रामदास कदम, नीलम गोऱ्हे, आ.विजय औटी, अनिल राठोड, शशिकांत गाडे, भाऊ कोरगावकर, विश्वनाथ नेरूरकर, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

राऊत म्हणाले, राज्यात भाजपा ५० आमदारांच्या पुढे जाणार नाही, तर शिवसेनेचे १५० आमदार विजयी होऊन २०१९ साली शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. भाजपाने सेनेवर भरपूर कुरघोडी केली, परंतु शिवसेना मजबूत असल्याने त्यांना अपयश आले. अमित शहांना सेनेची अ‍ॅलर्जी आहे, परंतु आता भगवा फडकणार आहे याची जाणीव झाल्याने ते मातोश्रीवर आले. आम्हाला त्यांची गरज नाही तर त्यांना आमची गरज असून त्यामुळेच आम्ही भाजपाला गुडघ्यावर  उभे केल्याचा टोला त्यांनी लगावला. अजित पवार व सुनील तटकरे यांना तुरूंगात टाकण्याची भाषा करणारे आतून मात्र त्यांच्याशी हातमिळवणी करीत आहेत. शनी शिंगणापूरप्रकरणी हे देव विकायला निघाले असून विश्वस्तांच्या नियुक्तीमध्ये मोदी किंवा शहा येणार नाहीत याची काळजी घ्या, असा चिमटा घेत झेंडा आमचा आणि दांडा तुमचा असे नाही, तर यंदा भगव्याला दांडा आमचा असेल आणि वेळप्रसंगी दांडा काढून झोडू व सत्तेचा माज उतरवू, अशी टीकाही राऊत यांनी केली. रामदास कदम, नीलम गोऱ्हे, विश्वनाथ नेरूरकर, आ. विजय औटी यांचीही भाषणे झाली.

बात मन की अन धन की !

पंतप्रधान मन की बात करतात, मात्र या बातनं शेतकऱ्यांच्या समस्या दूर झाल्या नाहीत. दूध दर मिळत नाही. मन की बात आणि निवडणुकीत धन की बात. कुठूून येतोय पैसा याचा मला संशय आहे. नोटाबंदीच्या काळात नाशिकला गुलाबी नोटांचे चार पाच ट्रक अगोदरच छापून ठेवलेले दिसतात. त्याशिवाय पैसा येऊच शकत नाही असा टोला राऊत यांनी लगावला.