सर्व रूग्ण देखरेखीखाली ठेवून विशेष औषधोपचार * म्युकोरमायकॉसिस प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या आ. सुधीर मुनगंटीवार

रवींद्र जुनारकर लोकसत्ता

चंद्रपूर:म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे १० रूग्ण चंद्रपुरात मिळाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या दहाही रूग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लक्ष दिले जात असून औषधोपचार सुरू आहेत.

कोराना उपचारादरम्यान देण्यात येणाऱ्या स्टेरॉईडमुळे रूग्णांना अतिशय गंभीर साईड इफेक्टचा सामना करावा लागत आहे. म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रूग्णांवर होत आहेत. राज्यभरात अशा रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. चंद्रपुरातही म्युकोरमायकॉसिसचे दहा रूग्ण मिळाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. शहरातील एका सिटी स्कॅन सेंटरमध्ये स्कॅन करतांना या रूग्णांमध्ये हा आजार मिळून आला आहे. या सर्व दहाही रूग्णांवर औषधोपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती ठिक असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. मात्र येत्या काळात या रूग्णांची संख्या तथा मृत्यू वाढण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली. विशेष म्हणजे या रोगावरील प्रतिबंधात्मक इंजेक्शन्स महागडे आहे, शस्त्रक्रियेचा खर्च देखील सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेरचा आहे. त्यामुळे या बुरशीजन्य संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या, विशेषत: अ‍ॅम्फोटरसीन झ्रबी हे इंजेक्शन प्रतिबंधक इंजेक्शन कमी किंमतीत उपलब्ध करावे तसेच गोरगरीब रूग्णांच्या सोयीच्या द़ष्टीने या उपचाराचा समावेश महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत करण्याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाला केली आहे. यासंदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविलेल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बऱ्या झालेल्या कोविड रूग्णांमध्ये हा दुर्मिळ संसर्ग आढळत आहे. याचा म़त्युदर हा ५४ टक्के असुन वेळेवर उपचार घेतल्यास आजारातुन बाहेर पडता येते. नाकावाटे ही बुरशी डोळे आणि मेंदुकडे वाढत जाते. लवकरात लवकर निदान झाल्यास इंजेक्शनच्या माध्यमातुन उपचार करता येतो. मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची वाढत होत आहे. डोळयांपाशी संसर्ग पोहचल्यास त्यांना कायम स्वरूपी इजा होण्याची शक्यता असते. अनेक रूग्णांचे डोळे यामुळे काढले गेले आहे. हा संसर्ग मेंदु पर्यंत पोहचल्यास उपचार करणे दुरापास्त होते व रूग्णांचा म़त्यु होतो. यासाठी अ‍ॅम्फोटरसीन झ्रबी हे इंजेक्शन प्रतिबंधक इंजेक्शन आहे. याची किंमत ४० ते ४५ हजार ईतकी आहे. ती सर्वसामान्य गरीब रूग्णाला परवडणारी नाही व एकुणच भारतात हे इंजेक्शन्सचा साठा संपल्याची माहिती आहे. त्यामुळे या इंजेक्शन्सचे उत्पादन मोठया प्रमाणावर करून कमी किंमतीत हे इंजेक्शन उपलब्ध होणे आवश्यक आहे. कारण या पुढच्या टप्प्यात जर शस्त्रक्रिया करावी लागली तर त्याचा खर्च किमान दिड ते दोन लाख असल्यामुळे सर्वसामान्य गरीब रूग्णाला ते परवडणारे नाही. त्याद़ष्टीने प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलत वरील प्रमाणे उपाययोजना करण्याची आवश्यकता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली आहे.