राज्यावर सध्या करोनाचं संकट असून त्याचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र करोनाचा संकट सामना करताना सध्या एक नवं संकट समोर आलं आहे. औरंगाबादमध्ये करोनासोबत ‘सारी’चा (सिव्हीअरली अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) आजार पसरत आहे. या आजारामुळे औरंगाबादमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान २३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारी आणि करोनाची लक्षणं सारखीच आहेत. करोनाप्रमाणे सारी आजाराचीही सर्दी, खोकला ताप हीच लक्षणे आहेत. सारीच्या रुग्णाला सर्दी, ताप, खोकला यासोबत श्वास घेताना त्रास होतो. यामुळे ही लक्षणं दिसू लागल्यानंतर करोनाची लागण झाली तर नाही ना याचीही खात्री केली जात आहे. यामुळे सारीच्या रुग्णांचे करोनाच्या तपासणीप्रमाणे घशातील द्रव तपासणीसाठी घेला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये आतारपर्यंत १०३ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. यामधील १० जणांचा मृत्यू झाला आहे. सारीच्या रुग्णांवर औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुर असताना सारी आजारामुळे त्यात भर पडू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व खासगी आणि शासकीय रूग्णालयांना सारीच्या रूग्णांची माहिती नियमितपणे सादर करण्यास सांगितलं आहे.