अंगणात खेळत असलेल्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी पांडूरंग कांबळे याला उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व पन्नास हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. सचिन सूर्यवंशी यांनी सांगितले की, डिसेंबर 2017 मध्ये प्रकरणातील पीडित मुलगा हा अंगणात एकटा खेळत असताना त्याचे तोंड दाबून ओढत रस्त्याच्या बाजूस असलेल्या खड्ड्यात आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच या घटनेविषयी कोणास सांगितल्यास कत्तीने मुंडके छाटून जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली. याबाबत पीडित मुलाच्या वडिलांनी शिराढोण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.

मंगरूळ येथील आरोपी पांडूरंग विठ्ठल कांबळे यास पोलिसांनी तत्काळ अटक केले. पोलीस उपनिरीक्षक एस. जी. माने यांनी तपास करून दोन महिन्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी पांडूरंग कांबळे हा पहाटे महिला ज्या ठिकाणी प्रातःविधीसाठी जातात, त्या ठिकाणी दररोज लपून बसत असे, तसेच त्याच्यावर यापूर्वीही विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर सात महिन्याच्या आत पूर्ण झाली. प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. प्रकरणातील पीडित मुलगा, मुलाचे आई-वडिल, महिला साक्षीदार आणि न्यायवैज्ञानिक प्रशोगशाळेचा अहवाल सिद्ध झाले. तसेच अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी पांडूरंग कांबळे यास सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.