कोल्हापूर म्हटले की आपल्याला आठवते ती पंचगंगा नदी. १५ वर्षांपेक्षा जास्त काळ ही नदी प्रदुषणाच्या विळख्यात सापडल्याची चर्चा होते आहे. मात्र आता ही नदी पुन्हा चर्चेत आलीये चोरीला गेल्याने. तुम्ही बरोबर वाचले आहे..

पंचगंगा नदी चोरीला गेल्याच्या १, २ नाही १०० तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. हातकणंगले पोलीस ठाण्यात कोल्हापूरकरांनी धाव घेऊन या तक्रारी केल्या आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारासच मासे पकडण्याचे जाळे आणि हलगी घेऊन १०० पेक्षा जास्त लोक हातकणंगले पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी पंचगंगा नदी चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवल्या.

पंचगंगा नदीवर आम्ही गेलो आणि तिथे नदीच नाही असे आम्हाला दिसले. त्यामुळे पंचगंगा नदी चोरीला गेली असून चोरट्यांना अटक करा अशी मागणी या सगळ्यांनी केली आहे. नदी चोरीला गेल्याच्या एकदम इतक्या तक्रारी आल्याने पोलीसही काहीसे चक्रावून गेले आहेत. मागच्या १५ ते २० वर्षांपासून पंचगंगा नदीला प्रदुषणाचा विळखा बसला आहे. नदीत जलपर्णी वाढल्याने नदीचे पाणी दुषित झाले आहे. या नदीत सांडपाणीही मिसळले जाते.

जयंती, दुधाळी, लाईन या ठिकाणचे नालेही या नदीतच मिसळले जातात. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. मात्र कारवाईची तात्पुरती मलमपट्टी झाल्यावर पुन्हा परिस्थिती जैसे थेच आहे. आता नदी इतकी दुषित झाली आहे की नागरिकांनी येऊन नदीच चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे.