वारणा धरण १०० टक्के भरले असून कोयना धरणातील पाणीसाठा १०० टीएमसीवर बुधवारी पोहोचला. वारणा धरणातून प्रतिसेकंदाला १२ हजार ६६१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदीतील पाण्याची पातळी विस्तारून तिरावरील शेती पाण्याखाली गेली आहे. चाखे-मांगले पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत आज अखेर १७५ टक्के पावसाने हजेरी लावली असून दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला टँकर मुक्ती लाभली आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी वारणानदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने काठावरील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत.
वारणा धरण क्षेत्रात चालूवर्षी आज अखेर २ हजार ६६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर धरण १०० टक्के भरले आहे. पाण्याची आवक लक्षात घेऊन सांडव्यावरून ११ हजार ९० आणि विद्युत निर्मितीसाठी १५७१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी आज सकाळी संपलेल्या २४ तासात शिराळा येथे ६, विटा व कडेगांव येथे ५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात ३ सप्टेंबर २०१३ अखेर सरासरी २९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. याच कालावधीत चालूवर्षी ५१९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आज अखेर १७५ टक्के पाऊस झाला आहे.
कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रापेक्षा चालू वर्षी पठारी प्रदेश असणाऱ्या दुष्काळी भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. नालाबांध, तलाव भरल्यामुळे जमिनीतील पाणी पातळीही वाढल्याने जत, आटपाडीसारख्या दुष्काळी भागातील पाण्याचे टँकर बंद करण्यात आले आहेत. दोन वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदाच पावसाने समाधानकारक स्थिती जिल्ह्यात निर्माण केली आहे.
दुष्काळी भागासाठी सुरू ठेवण्यात आलेल्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ प्रकल्पाचे पंप चार दिवसापासून पाटबंधारे विभागाने बंद केले आहेत. अद्याप परतीचा मान्सून सुरू झालेला नाही. त्यामुळे परतीच्या मान्सूनकडूनही पावसाची अपेक्षा आहे. जत, आटपाडी, खानापूर, विटा, कवठेमहांकाळ या तालुक्यात कायमपणे परतीच्या मान्सूनवरच अवलंबून रहावे लागत होते. मात्र यंदा प्रथमच मघा नक्षत्रापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावल्याने रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.