गडचिरोलीत १०० गावांचा संपर्क तुटला; रत्नागिरीतही जोरदार वृष्टी, पश्चिम महाराष्ट्रात संततधार

आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे विदर्भातील गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यला मुसळधार पावसाचा फटका बसला असून १०० गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक नद्यांना पूर आला असून सांगली आणि कोल्हापूरमध्ये नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातही जोरदार वृष्टी सुरू असून चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीला पूर आला आहे.

तीन आठवडे दडी मारून बसलेल्या पावसाने विदर्भात अनेक जिल्ह्य़ांत संततधार सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यतील पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे सुमारे १०० गावांचा संपर्क तुटला असून अमरावती जिल्ह्यतही मेळघाटातील सुमारे ३० गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे आलापल्ली ते भामरागड तसेच पेरमिली-भामरागड मार्ग बंद झाला आहे. अमरावती जिल्ह्यतील मेळघाटातून वाहणाऱ्या सिपना नदीला पूर आला असून १४ जणांचे बचाव पथक कार्यरत आहे. हरिसाल ते धाकरमलपर्यंत पूर असून दोन पूल वाहून गेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यत गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावात पूल ओलांडताना सोमवारी गायी वाहून गेल्या.

पश्चिम घाट परिसरातही पावसाने गेल्या ४८ तासांत चांगलाच जोर धरल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा या प्रमुख नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागांत या पुरामुळे धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच कृष्णा नदीने औदुंबरच्या मंदिरात प्रवेश केला आहे. सांगलीच्या आयर्वनि पुलाजवळ कृष्णा नदीतील पाणीपातळी सायंकाळी सहा वाजता ३० फूट  झाली आहे.  या पावसामुळे कोयना. चांदोली, राधानगरीसह महत्वाच्या धरणांच्या पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोयनेच्या जलसाठय़ात जवळपास पाच टीएमसीची वाढ होऊन तो ७३ टीएमसी (६९.३५ टक्के) झाला आहे. पावसाने खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.ोधानगरी धरण ९५ टक्के भरले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्य़ात गेल्या पाच-सहा दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गोदावरीला पूर

जोरदार पावसाने नाशिक शहरातून मार्गस्थ होणाऱ्या गोदावरीची पातळी उंचावली आहे. रामकुंडासह सायखेडा, चांदोरी भागातील मंदिरे पाण्याखाली बुडाली. पावसाचा जोर वाढल्यास अधिक पूरस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सलग पाचव्या दिवशी नाशिक जिल्ह्य़ाच्या काही भागांत संततधार सुरू राहिल्याने मंगळवारी आळंदी, वालदेवी, भाम आणि कडवा या धरणांमधून पाणी सोडण्यात आले. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून ८८३३, तर आळंदीमधून २४३ क्युसेसचा विसर्ग होत आहे. सद्यस्थितीत गंगापूर, दारणा, भावली, कडवा, भाम, आळंदी, वालदेवी, पालखेड, पुनद आणि नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग सुरू आहे. नाशिकमधून मराठवाडय़ातील जायकवाडीसाठी आतापर्यंत १० टीएमसीहून अधिक पाणी सोडले गेले आहे. जिल्ह्य़ात २४ तासात ६५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा आणि पेठ या तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे.

रत्नागिरीत जोर

* वादळी वाऱ्यांसह रत्नागिरी शहर आणि जिल्ह्य़ातही मुसळधार पावसाचा धुमाकूळ चालूच असून अमावास्येच्या पूर्वसंध्येला राजापूर, संगमेश्वरसह रत्नागिरीतील नदीकिनाऱ्यावरील वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे.

* रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठेतील सुमारे ३५ दुकाने रात्रभर पाण्याखाली होती. नेहमीप्रमाणे राजापुरातील जवाहर चौकात पाणी भरले असून चिपळूणमध्येही वाशिष्ठी नदीला आलेल्या पुराने पुन्हा एकदा थैमान घातले आहे.

* मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी ९३.७८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यात लांजा तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे १६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून खेड आणि चिपळूण तालुक्यांत प्रत्येकी १२० मिलीमीटर पाऊस या कालावधीत पडला आहे. मंडणगड (११० मिमी), संगमेश्वर (१०४), दापोली (८७), गुहागर (८२) आणि रत्नागिरी (५० मिमी) याही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळला. त्या तुलनेत राजापूर तालुक्यात अगदीच कमी म्हणजे ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  पण सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथे उगम पावून या तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली.