पालघर-वाडा-देवगाव-नाशिक रस्त्याचे रुंदीकरण

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा : पालघर- वाडा-देवगाव- नाशिक या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत रुंदीकरणात वाडा शहरातील १०० वर्षे जुने असलेले महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाची इमारतही येत असल्याने त्या इमारतीवरही लवकरच हातोडा पडणार आहे.

पालघर – वाडा – देवगाव- नाशिक हा राज्यमार्ग वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेतून जात आहे. या राज्यमार्गाचे १६ मीटर रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले होते. प्रशासनाने आखुन दिलेल्या रुंदीप्रमाणेच रुंदीकरण झाले पाहिजे अशी मागणी  वाडा पूर्व विभागातील कार्यकर्ते, नव्याने स्थापन झालेला व्यापारी संघ व स्थानिक खासदार व आमदारांनी केली होती. तर येथील बाधीत होणारे व्यापारीवर्गाने या मागणीला विरोध दर्शविला होता. यामुळे या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम बरेच दिवस रखडले होते. या रस्त्याच्या रखडलेल्या कामाला पुन्हा जोमाने सुरुवात झाली आहे. रुंदीकरणात तोडण्यात येणाऱ्या वाचनालयाची वास्तू ही १९१० साली बांधण्यात आली आहे. या वाचनालयाला अ वर्ग तालुका वाचनालयाचा दर्जा आहे. येथील कार्यकारी मंडळाने स्वत:हुन वाचनालयाची इमारत तोडण्यासाठी काही दिवसांचा अवधी मागितला असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष युवराज ठाकरे यांनी सांगितले.