एक हजार खाटांची सुविधा; रुग्णाला चाचणी अहवाल लेखी स्वरूपात देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पालघर : करोना संक्रमणाची व्याप्ती वाढल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यात एक हजार खाटांचे जम्बो करोना उपचार केंद्र उभारण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. करोनाबाधितांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुलभतेने माहिती मिळण्यासाठी येत्या काही दिवसांत जिल्ह्यात २४ तास सुरू असणारे मदत केंद्र (हेल्प डेस्क) सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संसर्ग झालेल्या रुग्णाला आरोग्य विभागाने लेखी स्वरूपात चाचणी अहवालाची माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी यापूर्वी १४ व्हेंटिलेटर उपलब्ध होते. करोना संक्रमणाच्या काळात सात नवीन व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले असून त्यातील तीन विविध संस्थांनी सामाजिक दायित्व निधीतून प्रदान केले आहेत. याखेरीज विक्रमगड तालुक्यातील रिवेरा रुग्णालयात ३४ व्हेंटिलेटर कार्यरत आहेत. असे असले तरी या आजाराची व्याप्ती व प्रसार पाहाता येणाऱ्या काळात एक हजार रुग्णांवर उपचार करता यावे इतकी क्षमता असणारे जम्बो उपचार केंद्र उभारण्याचे निर्देश एमएमआरडीए आयुक्त यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्या दृष्टीने ते काम महिन्याभरात हे नियोजित केंद्र उभारण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

जिल्ह्यातील खासगी संस्थांकडून रुग्णांना अधिक बिलाची आकारणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त असून त्याची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. अधिक प्रमाणात बिल आकारणीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची लेखापरीक्षकांमार्फत चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

जिल्ह्यामध्ये तपासणीकरिता वापरण्यात येणारा वायरस ट्रान्समिशन मीडिया (एटीएम) किटच्या पंधरा हजार प्रती खरेदी करण्यात आल्या असून आगामी काळात वॅक्सीन कॅरिअरदेखील खरेदी करण्यात येणार आहेत. जिल्ह्यामध्ये पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) किट उत्पादित होत असून एन-९५ मास्क व  हॅण्ड ग्लोजचा पुरेशा प्रमाणात साठा असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता असल्याने खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करून त्यांना शासकीय दराप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. असे असले तरी तज्ज्ञ डॉक्टर, मायक्रोबायोलॉजिस्ट, व्हेंटिलेटर चालवण्यासाठी इण्टेन्सिव्हिस्ट मिळण्यामध्ये अडचणी येत असल्याची त्यांनी माहिती दिली.

जिल्ह्यातील बाधित रुग्णांना उपचार केंद्रांमधील रिकाम्या खाटांची माहिती मिळावी, रुग्णवाहिका उपलब्धतेसाठी सहयोग मिळावे व इतर सर्व संबंधित माहिती मिळण्यासाठी २४ तास सुरू असणारे मदत केंद्र (हेल्प डेस्क) सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता टोल फ्री क्रमांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

आरोग्य विभागाची सज्जता

जिल्ह्यात सध्या ५८ जीवन रक्षा प्रणाली (व्हेंटिलेटर) उपलब्ध असून करोनाची लक्षण नसणाऱ्या रुग्णांसाठी २२७० खाटा, ऑक्सिजनपुरवठा लागणाऱ्या रुग्णांसाठी ४३६ खाटा व गंभीर असणाऱ्या रुग्णांसाठी ४५५ आयसीयू खाटा उपलब्ध असून त्यापैकी सध्या २५ टक्के वापर होताना दिसून येत आहे अशी माहितीसुद्धा या वेळी देण्यात आली.

लक्षणे नसणाऱ्या रुग्णांचे घरी अलगीकरण

अनेक संशयित रुग्णांना तपासणी केल्यानंतर अहवाल येईपर्यंत तसेच संसर्ग झालेल्या ज्या रुग्णांना आजाराची लक्षणे न दिसणाऱ्या (एसिम्प्टोमॅटिक) रुग्णांना आपल्या घरीच विलगीकरण करण्यासाठी मागणी होत आहे. राज्य शासनाने त्यादृष्टीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणार असून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या समितीमार्फत त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. अशा नागरिकांकडे व रुग्णांकडे स्वतंत्र राहण्याची सुविधा असल्यास त्यांच्याकडून हमी (अंडरटेकिंग) पत्र घेऊन लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना स्वत:च्या घरी अलगीकरण करण्याची मुभा देण्यात येणार आहे. यासंदर्भात लेखी सूचना प्रसिद्ध करण्यात येतील असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.