वसई विरार शहरामधील करोनाबाधित रुग्णांची संख्या शनिवारी १० हजारांवर पोहोचली. १३ मार्च रोजी शहरात करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर या रुग्णसंख्येत वाढ होत जाऊन १८ जुलै रोजी म्हणजे १२२ दिवसांनी करोनाची संख्या १० हजार ९ एवढी झाली आहे.

वसई विरार शहरात १३ मार्च रोजी पहिला करोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर त्यात वाढ होत गेली. सध्या दिवसाला सरासरी ३०० रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार १८ जुलै रोजी शहरातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा १० हजार ९ एवढा झाला. त्यात वसई विरार महापालिका हद्दीतील ९ हजार ५७६ आणि वसई ग्रामीण परिसरातील ४३३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील ६ हजार ५५२ रुग्ण करोनामुक्त झाले असून १९९ रुग्णांचा बळी गेला आहे. सध्या शहरात ३ हजार २५८ रुग्ण उपचार घेत आहेत.