महाराष्ट्रात चोवीस तासात १०२६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर ५३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या आता २४ हजार ४२७ झाली आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ९२१ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज महाराष्ट्रात ३३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत ५ हजार १२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज राज्यात ज्या ५३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी मुंबईत २८, पुण्यात ६, पनवेलमध्ये ६, जळगावात ५, सोलापूरमध्ये ३, ठाण्यात २, रायगडमध्ये १, औरंगाबादमध्ये १ आणि अकोल्यात १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष आणि २४ महिला आहेत. या मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे २१ रुग्ण होते. तर २७ जण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. तर ५ जण हे ४० वर्षे वयाच्या खालील होते. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५ नमुन्यांपैकी १ लाख ९५ हजार ८०४ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर २४ हजार ४२७ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८१ हजार ६५५ लोक होम क्वारंटाइन आहेत तर १५ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.