News Flash

जि. प. शाळेत खिचडीतून १०३ विद्यार्थ्यांना विषबाधा

खिचडी खाल्ल्याने १०३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

| July 19, 2015 01:52 am

दुपारी मधल्या सुटीत देण्यात आलेली खिचडी खाल्ल्याने १०३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील पहिली ते सातवीपर्यंतच्या जि. प. प्रशालेत शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला.
या शाळेत १८६ विद्यार्थी शिक्षण घेतात. मधल्या सुटीत या विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. मात्र, खिचडी खाल्ल्यावर शंभरावर विद्यार्थ्यांना पोटात मळमळ होऊन उलटय़ांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शिक्षक व गावकऱ्यांनी या विद्यार्थ्यांना अंधोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जास्त त्रास होत असल्याने विद्यार्थ्यांना अहमदपूरला ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेथे प्राथमिक उपचारानंतर ७५ विद्यार्थ्यांना घरी जाऊ देण्यात आले. २८ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. अन्न शिजवण्यात येत असलेली जागा नियमित स्वच्छ ठेवण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक बालाजी नयने यांनी सांगितले. मात्र, खिचडीचा वास येत असल्याचे सांगत सरकारतर्फे निकृष्ट अन्नधान्य पुरवठा होतो. त्याची तपासणी करून निकृष्ट पुरवठा बंद करण्याची मागणी पालकांनी केली. खिचडीत वापरण्यात आलेले वाटाणे खराब होते, अशी तक्रार काही पालकांनी केली.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे, तहसीलदार विजय अवधाने यांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालयात पालकांसह गावकऱ्यांची गर्दी होती. दरम्यान, या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी स्पष्ट केले. खिचडीचे नमुने अन्न-औषध विभागाकडे पाठवण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी सांगितले. माजी आमदार बाबासाहेब पाटील, तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद हेंगणे, शंकरराव जाधव, जि. प. सदस्य रेखाताई तरडे यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 1:52 am

Web Title: 103 students food poison
Next Stories
1 रंगतदार तिहेरी लढतीत मूलभूत प्रश्नांना बगल!
2 पीकविमा, खरीप पीककर्जाचे जालन्यात धिम्या गतीने वाटप!
3 चांदोबाचा लिंबमध्ये रंगले माउलींचे पहिले उभे रिंगण
Just Now!
X