जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात अद्यापही दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात १० हजार ३०९ नवे करोनाबाधित आढळून आले व ३३४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. तर, दिलासादायक बाब म्हणजे ६ हजार १६५ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ४ लाख ६८ हजार २६५ वर पोहचली आहे. यामध्ये १ लाख ४५ हजार ९६१ अॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले ३ लाख ५ हजार ५२१ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १६ हजार ४७६ जणांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचा प्रमाण (रिकव्हरी रेट) ६५.२५ टक्के झाले आहे. तर, मृत्यू दर ३.५२ टक्के आहे. आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या  २४ लाख १३ हजार ५१० नमूण्यांपैकी ४ लाख ६८ हजार २६५ (१९.४० टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीस राज्यात ९ लाख ४३ हजार ६५८ जण गृह विलगीकरणात (होम क्वारंटाइन) व ३६ हजार ४४६ जण संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्ट्यूटिशनल क्वारंटाइन) मध्ये आहेत.

मुंबईत आज १ हजार १२५ नवे करोनाबाधित आढळले तर ४२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आज दिवसभरात ७११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १ लाख १९ हजार २५५ वर पोहचली. यामध्ये २० हजार ६९७ अॅक्टिव्ह रुग्ण, आतापर्यंत मृत्यू झालेल्या ६ हजार ५८८ जणांचा व करोनामुक्त झालेल्या ९१ हजार ६७३ जणांचा समावेश आहे.