राज्यात १०६१ लाख क्विंटल साखर उत्पादन; जालन्यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम

सुहास सरदेशमुख लोकसत्ता

औरंगाबाद : जालना जिल्ह्य़ात अतिरिक्त ठरू शकणाऱ्या ऊस क्षेत्रामुळे राज्यातील गाळप हंगाम मे महिन्यापर्यंत लांबला असून सोमवापर्यंत राज्यातील सहा साखर कारखाने सुरू होते. या वर्षीच्या गाळप हंगामात राज्यात १०६१.४२  लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्यात साखर कारखान्यांनी आतापर्यंत १०११ लाख टन ऊसाचे गाळप केले असून १०.४९ टक्के साखर उतारा मिळाला आहे. या वर्षी इथेनॉल प्रकल्पांना अधिक चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद होण्याच्या काळात निर्माण झालेल्या ऑक्सिजन समस्येवरही साखर कारखान्यांनी उत्तर शोधले आहे. पण १९० पैकी इथेनॉलनिर्मितीची क्षमता असणाऱ्या  ६६ कारखान्यांपैकी बहुतांश कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे नव्याने प्रस्तावित ऑक्सिजन प्रकल्पासाठी लागणारे इंधन आणि लागणारी वाफ उपलब्ध नाही. त्यामुळे इथेनॉलपासून केलेला प्रयोग ‘ प्रायोगिक’ पातळीवरच राहण्याची शक्यता आहे. मात्र आवश्यकता भासलीच तर प्राणवायू प्रकल्प उभारता येतील, असे सांगण्यात येत आहे.

राज्यात या  हंगामात ९५ सहकारी तर तेवढेच खासगी कारखाने सुरू झाले. राज्यात सर्वाधिक २५ सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्य़ात सर्वाधिक २९ खासगी कारखाने सोलापूर जिल्ह्य़ात सुरू होते. सर्वाधिक ४६ साखर कारखाने मराठवाडय़ात सुरू होते. गेल्या वर्षी झालेल्या पावसाने दुष्काळ आणि पाणी उपसा याची सारे गणिते विसरून शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली. जालना जिल्ह्य़ात गोदाकाठच्या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात ऊस झाला. या जिल्ह्य़ातील कारखान्यांची गाळप क्षमता तेवढी नव्हती. त्यामुळे नगर जिल्ह्य़ातही ऊस गाळपासाठी पाठविण्यात आला. सध्या नगर जिल्ह्य़ातील भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, वृद्धेश्वर साखर कारखाना, जालना येथील समर्थ आणि सागर या दोन कारखान्यांसह समृद्धी व श्रद्धा एनर्जी हे कारखाने सध्या सुरू आहेत. बाकी कारखान्यांच्या आवारातील ऊस गाळप संपले आहे. एका बाजूला आरोग्याचे प्रश्न हाताळताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ऊस गाळपाकडेही खासे लक्ष द्यावे लागले. पण राज्यातील १९० कारखान्यांच्या माध्यमातून निर्माण झालेली साखर ही उत्तर प्रदेशापेक्षा कमी आहे. कमी साखर कारखाने असतानाही या वर्षी १० मे पर्यंतच्या अहवालानुसार राज्यातील १०११ टन असल्याचे दिसून आले आहे. तर उत्तर प्रदेशातील उत्पादन काहीसे अधिक असल्याचे दिसून येत असल्याचे अहवाल राष्ट्रीय साखर संघाकडेही उपलब्ध आहेत.

धाराशिव कारखान्याचे यश

या वर्षी राज्यातील इथेनॉल उत्पादनात वाढ करण्यासाठीही खासे प्रयत्न करण्यात आले. आता इथेनॉलनिर्मितीमधील उपकरणे वापरून प्राणवायूही निर्माण करता येतो हे धाराशिव साखर कारखान्याने प्रयोगाने सिद्ध झाले आहे. त्यामुळे गरज भासलीच तर असे प्रकल्प उभे करता येऊ शकतील, अशी तजवीज करण्यात आली आहे.

पण कमी होणारी रुग्णसंख्या इथेनॉल, ऑक्सिजन यातील फरक लक्षात घेऊन आणि तातडी लक्षात घेऊन बदल केले जातील, असे सांगण्यात येते आहे. पण ज्या वर्षी अधिक पाऊस त्या वर्षी अधिक ऊस हे चित्र या हंगामात पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ऊस गाळपाची आकडेवारी

* साखर कारखान्यांची संख्या- १९०

* दैनंदिन गाळप क्षमता- ७२८४८० मे. टन

* ऊस गाळप- १०११.५३ लाख मेट्रिक टन

* साखर उत्पादन- १०६१.४२ लाख क्विंटल

* राज्यातील साखर उतारा- १०.४९

* कोल्हापूर विभागातील साखर उतारा सर्वाधिक १२ टक्के एवढा आहे. तर अमरावती आणि नागपूर विभागातील साखर उतारा सर्वात कमी म्हणजे अनुक्रमे ८.९३ व ८.९७ टक्के एवढा आहे.

हा हंगाम लागवड झालेला ऊस आणि त्या-त्या भागातील कारखान्यांच्या क्षमतांमुळे लांबला हे खरे आहे. अलीकडच्या दहा वर्षांतला हा सर्वाधिक लांबलेला हंगाम होता. या वेळी आलेल्या करोना महामारीत माणूस वाचला पाहिजे या भूमिकेतून साखर कारखान्यांनी केलेल्या प्रयोगाला यश मिळाले. त्याचा देशात निश्चितच उपयोग होईल.
– जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष राष्ट्रीय साखर महासंघ