केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जिरायत शेती हे मोठे आव्हान असून, कोरडवाहू शेती अभियानाच्या माध्यमातून एका वर्षात तालुक्यातील ७२ हजार शेतक-यांना विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे १०७ कोटी रुपयांच्या मदतीचा पर्याय आपण देऊ शकलो ही मोठी उपलब्धी असल्याचे प्रतिपादन कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
कृषी आणि पणन विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या कोरडवाहू शेती प्रकल्पांतर्गत यांत्रिकीकरण निधीच्या माध्यमातून सुमारे २ कोटी रुपयांच्या ५५ ट्रॅक्टरचे वाटप विखे यांच्या हस्ते केलवड येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब डांगे, सभापती निवास त्रिभुवन, उपसभापती सुभाष विखे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कडू, उपसभापती अशोक जमधडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, की राज्यातील ८२ टक्के, २० लक्ष हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळेच सर्व योजना एकत्र करून २० कोटी रुपयांचा आराखडा तयार केल्याचे सांगून किमान १० लाख हेक्टर क्षेत्र पहिल्या टप्प्यात अवर्षणमुक्त होऊ शकेल. प्रत्येकाने विमा उतरविणे गरजेचे आहे. शेतक-यांची फसवणूक होऊ नये म्हणून खते आणि बियाण्यांचा काळा बाजार रोखू शकलो. आता याच्या उपलब्धतेबाबत सर्व माहिती मोबाइलवर मिळणार आहे. एकात्मिक पाणलोट क्षेत्राचाही मोठा कार्यक्रम तालुक्यात घेतला आहे. भविष्यात शेतीमाल निर्यातीला मोठा वाव असल्याने जास्तीतजास्त पॉलिहाऊस उभारण्याची आवश्यकता आहे.
सुभाष गमे यांनी प्रास्ताविक केले. उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी विविध योजनांची माहिती दिली. गारपिटीमुळे घरांची पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांना मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. यात ७० हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान असलेल्या नागरिकांना डॉ. सुजय मित्रमंडळाच्या वतीने उर्वरित मदतीचा समावेश होता.
‘प्रवरा व गणेशमध्ये भेदभाव नाही’
या वर्षी गणेश कारखाना सुरू होणार असून परिसराची कामधेनू म्हणून आपण या कारखान्याची विक्री होऊ दिली नाही. हा कारखाना सहकारी तत्त्वावरच राहणार आहे. प्रवरा आणि गणेशमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे विखे म्हणाले.