News Flash

‘१०८ क्रमांका’ची रुग्णसेवा विविध व्याधींनी ‘बाधित’

राज्याचा आरोग्य विभाग ‘बीव्हीजी’ या संस्थेमार्फत ही सेवा उपलब्ध करते.

 

 

नगर : राज्यासाठी उपयुक्त ठरलेली ‘१०८’ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा विविध कारणांनी ‘बाधित’ झाली आहे. नादुरुस्त रुग्णवाहिका, त्यातून आवश्यक व पुरेसा औषधसाठा नाही, जिल्ह्य़ाचे व्यापक भौगोलिक क्षेत्र व मोठय़ा लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या संख्येने असलेल्या रुग्णवाहिका, अपुऱ्या संख्येने असलेले डॉक्टर व चालक अशा विविध ‘व्याधीं’नी ही सेवा गेल्या सुमारे पाच महिन्यांपासून ग्रस्त झाली आहे. त्याचा परिणाम रुग्णांच्या वाहतुकीवर, तातडीने सरकारी रुग्णालयात पोहचवण्यावर झाला आहे. गंभीर परिस्थितीतील रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोचून वेळेत उपचार सुरू झाल्यास त्याला जीवदान मिळू शकते, या मूळ हेतुलाच या व्याधीने बाधा आणली आहे.

राज्याचा आरोग्य विभाग ‘बीव्हीजी’ या संस्थेमार्फत ही सेवा उपलब्ध करते. जिल्ह्य़ात सध्या ४० रुग्णवाहिकांमार्फत (त्यातील ९ अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्टच्या) ही सेवा चालवले जाते. परंतु जिल्ह्य़ाचे मोठे क्षेत्र व लोकसंख्या विचारात घेता ही संख्या अपुरी ठरते आहे. त्यातील नादुरुस्त रुग्णवाहिकांची संख्या ७ आहे. चिंचोंडी पाटील, जेऊर, तळेगाव दिघे, नान्नज, कोल्हार, राहाता या केंद्रावरील वाहने बंद आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या २० ते २२ आहे.

या रुग्णवाहिकांवर १२० डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्ष उपलब्ध केवळ ६२ आहेत. कमी वेतन व आरोग्य विभागाचा ‘आरोग्यवर्धिनी’ उपक्रम सुरू झाल्यानंतर तेथे मिळणाऱ्या अधिक मानधनामुळे अनेक डॉक्टर तेथे रुजू झाले आहेत. रुग्णवाहिकेवर नियुक्त करण्यात आलेले सर्वच डॉक्टर ‘बीएएमएस’ आहेत. त्यांनाच तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन हृदयविकाराच्या रुग्णवाहिकांवर नियुक्त करण्यात आले आहे.

रुग्णवाहिकांचे क्षेत्र जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनी ठरवून दिले आहे. मात्र १०८ चे नियंत्रण पुणे येथून होते, तेथूनच कोणती रुग्णवाहिका कोठे जाणार याची सूचना दिली जाते. मध्यंतरी काही रुग्णवाहिका टायरअभावी जागेवर उभ्या होत्या. अलिकडे टायर मिळाले आहेत.

रुग्णवाहिकेत अनेकदा औषधांचा साठा नसल्याचे आढळते. ही सर्व जबाबदारी बीव्हीजी संस्थेची आहे, त्यांच्यावर कारवाईचे अधिकार जिल्हास्तरावर नाहीत. त्यामुळे बीव्हीजी संस्थेशी आरोग्य विभागाचे अधिकारी केवळ पत्रव्यवहार करतात, मात्र सुधारणा होत नाहीत.

इतर कामांसाठी वापर

रुग्णवाहिकांसाठी सुरुवातीला ३० किमी अंतराची मर्यादा ठरवून दिली होती. परंतु आता ती मर्यादा पाळली जात नाही. या सेवेच्या रुग्णवाहिका अनेकदा मंत्र्यांचे दौरे, लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रमासाठी केलेली सूचना, मॅरेथॉन स्पर्धा आदी कामांसाठीही वापरली जाते, त्यामुळे अत्यावश्यक परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. रुग्णवाहिका रुग्णांना सरकारी रुग्णालयात वेळेत पोहचवण्यासाठी आहेत, मात्र रुग्णांना खासगी रुग्णालयात नेले जात असल्याच्याही तक्रारी आहेत.

रुग्णांची वाहतूक घटली

आरोग्य विभागाने बीव्हीजी संस्थेमार्फत ही सेवा सन २०१४ पासून सुरू केली. सुरुवातीची चार वर्षे सेवा चांगलीच उपयुक्त ठरल्याचे आकडेवारीहून स्पष्ट होते. नंतर मात्र सेवा बाधित झाल्याने रुग्णांची संख्या घटली. सन २०१४-८ हजार ५२२, सन २०१५-१९ हजार ६९७, सन २०१६-२६ हजार ५०१, सन २०१७-३० हजार १६९, सन २०१८-१५ हजार ६४३, तर यंदा एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यान १७ हजार १३९. गेल्या दोन वर्षांपासून रुग्णांची वाहतूक कमालीची घटत आहे.

पत्र देऊनही पूर्तता नाही

रुग्णवाहिकांची तपासणी केली असता स्वच्छता नसणे, डॉक्टर नसणे, औषधसाठा नसणे, डॉक्टर रुग्णवाहिकेत रुग्णाशेजारी बसण्याऐवजी चालकाशेजारी बसणे, टायर खराब झाल्याने रस्त्यावर धावताना अडचणी, रुग्णवाहिकांच्या दुरुस्तीला लागणारा वेळ अशा अनेक त्रुटी जाणवतात. डॉक्टरांच्या अपुऱ्या संख्येची मोठी अडचण आहे. यासंदर्भात बीव्हीजी संस्थेला चार-पाच महिन्यांत अनेकदा पत्रे दिली मात्र त्याची पूर्तता होताना दिसत नाही.

-डॉ. प्रदीप मुरंबीकर जिल्हा शल्यचिकित्सक, नगर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 1:58 am

Web Title: 108 emergency number ambulance service no necessary and adequate pharmacy akp 94
Next Stories
1 पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप
2 ‘फेसबुक’च्या माध्यमातून  दोन मूकबधिर विवाह बंधनात
3 नवनवीन संशोधने आत्मसात करून शिक्षण प्रणाली राबवावी – शरद पवार
Just Now!
X