निखिल मेस्त्री

सर्व पिकांच्या लागवडीखाली २५१६ हेक्टर जमीन; पाऊस लांबल्याने कामांना उशीर

जिल्ह्य़ातील आठ तालुके मिळून शंभर टक्के भातपेरण्या पूर्ण झाल्या आहेत. रोपवाटिकामधील भातांची रोपे लागवडीयोग्य झाली आहेत. ८ जुलैपर्यंत जिल्ह्य़ात एक हजार ८० हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड (रोपणी) झाली आहे. त्याची टक्केवारी १.४१ टक्के इतकी आहे. गतवर्षीची लागवडीची हीच टक्केवारी १०.५६ टक्के इतकी होती.

यंदा पाऊस १० ते १२ दिवस उशिराने सुरू झाल्याने या लागवडीला विलंब झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. भातपिकासह जिल्ह्य़ातील नागली, वरई, तूर, उडीद, कुळीथ आणि खुरासनी पिकाखाली दोन हजार ५१६ हेक्टर प्रत्यक्ष लागवड झालेली आहे.

जिल्ह्य़ाचे प्रमुख पीक भात आहे. याशिवाय डोंगर आणि ग्रामीण क्षेत्रात खरीप हंगामात इतर पिके घेतली जातात. या ठिकाणी गरवे, हळवे आणि निमगरवे भातपिकाचे उत्पादन घेतले जाते.

डोंगरी आणि ग्रामीण क्षेत्रातील जमीन भुसभुशीत (हलकी) असल्यामुळे या ठिकाणी १२० दिवसापर्यंत वाढणारे आणि तयार होणारे हळवे भातपीक, सागरी भागातील वजनी आणि मध्यम (कडक) ठिकाणच्या जमिनीत गरवे आणि निमगरवे पीक घेतले जाते.

जुलै महिन्यात लागवडीनंतर निमवेष्टित युरिया वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यामुळे सध्या जिल्ह्य़ाला आवश्यक मागणीपैकी ८० टक्के खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. जूनच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवडय़ात पावसाला सुरुवात होते. त्यानुसार शेतकरी लागवडीच्या कामांना सुरुवात करतात. परंतु यंदा जून ओलांडून गेल्यानंतरही पावसाला आरंभ झालेला नव्हता. त्यामुळे शेतीच्या कामांना उशिरा सुरुवात झाली होती. त्यामुळे पेरणीची टक्केवारी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे.

इतर पिके

भातपिकाखालील एक हजार ८० हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष लागवडीचे असून विक्रमगड, जव्हार, मोखाडा असे तीन तालुके मिळून २०० हेक्टर क्षेत्र नागली पिकाच्या प्रत्यक्ष लागवडीखालील आहे. तर या तीन तालुक्यांमधून १०५ हेक्टर क्षेत्र हे वरई पिकाखालील आहे. याचबरोबरीने वाडा, वसई तालुका वगळल्यास इतर तालुक्यांमधून ४९२.११ हेक्टर क्षेत्र तूर पिकाखालील आहे. वसई, पालघर, डहाणू हे क्षेत्र सोडून इतर तालुके ५३२.४२ हेक्टर क्षेत्र हे उडीद पिकाच्या प्रत्यक्ष पेरणी क्षेत्रातील आहेत. वाडा तालुक्यात खुरासनी या पिकाखाली एकूण ४० हेक्टर क्षेत्र हे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्राचे आहे. या सर्व पिकांची जिल्ह्य़ाची प्रत्यक्ष लागवड क्षेत्र २५१६.५३ हेक्टर असून त्याची टक्केवारी २.३७ टक्के इतकी आहे.