नव्याने ४०३ जण बाधित

धुळे : शहर आणि जिल्ह्यत करोनाचा फैलाव होतच असून दोन दिवसांत अर्थात ४८ तासात ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूची एकूण संख्या १७३ वर पोहोचली आहे. नव्याने ४०३ रुग्ण वाढले आहेत. त्यात धुळ्यातील एका लोकप्रतिनिधीचाही समावेश आहे. जिल्ह्यतील एकूण करोनाग्रस्तांची संख्या साडेपाच हजारांपुढे गेली आहे. त्यातील तीन हजार ९२९ जणांना आतापर्यंत रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शहरातील एका लोकप्रतिनिधीस करोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून त्यांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. या पाश्र्वभूमीवर सोमवारी महापालिका इमारतीत फवारणी करण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी संबंधित लोकप्रतिनिधींच्या हस्ते मनपा आवारात ध्वजवंदन करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित संपूर्ण आवार, महापौरांसह, आयुक्त, अभियंता यांच्या दालनात फवारणी करण्यात आली. सोमवार आणि मंगळवारी महापालिका बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधितांच्या संपर्कात आल्याने आयुक्तांसह अधिकारी आणि अनेक कर्मचारी यांना खबरदारी म्हणून विलगीकरणात जावे लागण्याची आणि करोना चाचणी करून घ्यावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

शहरासह जिल्ह्यात शनिवार आणि रविवार या दोन दिवसात ४०३ नवीन करोनाबाधित आढळून आले. रविवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत धुळे शहरात सर्वाधिक दोन हजार ७९१ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील दोन हजार ६७ जणांनी करोनावर मात केली आहे. धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा या तालुक्यांत दोन हजार ८२८ जणांना लागण झाली असून त्यातील एक हजार ८६२ जण करोनामुक्त झाले आहेत. ८८ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.