05 August 2020

News Flash

आषाढीसाठी पंढरीत ११ लाख वैष्णवांची मांदियाळी

आषाढीच्या पूर्वसंध्येला तब्बल ११ लाख भाविक शहरात दाखल झाले होते.

विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या संतांच्या पालख्या गुरुवारी पंढरीत दाखल झाल्या. आषाढी एकदशी सोहळय़ाच्या पूर्वसंध्येला पंढरीत तब्बल ११ लाख वारकरी दाखल झाले आहेत. वैष्णवांच्या या मांदियाळीने चंद्रभागेच्या तीरावर तयार करण्यात आलेल्या वारक ऱ्यांचा तळ अवघा फुलून गेला होता. (छाया-राहुल गोडसे)

संतांच्या पालख्या चंद्रभागातीरी विसावल्या

मंदार लोहोकरे, पंढरपूर

ऊन,वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेकडो मैल पायी चालत केवळ त्या सावळय़ा विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या लाखो वैष्णवांचा सोहळा आज गुरुवारी पंढरीत दाखल झाला. राज्यभरातून निघालेल्या सर्व संतांच्या पालख्यांनी आज सायंकाळी शहरात प्रवेश केला आणि अवघी पंढरी विठुरायाच्या गजरात दंग झाली. आषाढीच्या पूर्वसंध्येला तब्बल ११ लाख भाविक शहरात दाखल झाले होते.

‘माझ्या जीवाची आवडे .पंढरपुरा नेईन गुढी’ असे म्हणत लाखो वारकरी दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरीला येतात. गुरुवारी वाखरी येथे विसावलेल्या संतांच्या पालख्या आणि वारकऱ्यांना कालपासूनच पंढरीची ओढ लागली होती. संत मुक्ताबाई ,संत गजानन महराज यांच्या पालख्या बुधवारी पंढरीत दाखल झाल्या.  संत मुक्ताई आणि संत नामदेव यांची पालखी आज दुपारी वाखरी येथे आली. यानंतर ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि या तिन्ही भावंडांची लाडकी बहीण मुक्ताई यांच्या पालख्या दाखल झाल्या आणि या भावंडांची भेट घडली. या सर्व पालख्या आणि त्यांच्यासोबत चालत आलेला अवघा वैष्णव यांची भेट झाली आणि अवघा सोहळा चैतन्यमय झाला. या सर्व वैष्णवांचे मिळून वाखरीत उभे रिंगण पार पडले आणि विठ्ठलाचा धावा करत सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या.

पंढरपूरच्या वेशीजवळ पालखी आल्यावर  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका शितोळे सरकार यांच्या गळ्यात घातल्या गेल्या. या वेळी शितोळे यांच्या बाजूला वासकर आणि आरफाळकर महाराज होते. माउलींच्या पाठोपाठ संध्याकाळपर्यंत सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये विसावल्या.

दरम्यान, या सर्व पालख्यांच्याबरोबरीने आलेल्या वारकऱ्यांसह आषाढीसाठी लाखो वैष्णवांची आज पंढरीत एकच मांदियाळी जमली. संध्याकाळपर्यंत भाविकांचा हा आकडा अकरा लाखांवर गेला होता. शहरातील मठ, धर्मशाळा, लॉज, मोकळी मैदाने वारकऱ्यांच्या या गर्दीने फुलून गेली होती. विठ्ठल मंदिराभोवती तर या गर्दीने उच्चांक केला होता.

चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत वारकऱ्यांसाठी तळ तयार करण्यात आला आहे. येथे पालिकेच्यावतीने वीज, पाणी, शौचालय, वैद्यकीय सेवा, पोलीस बंदोबस्त आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. हा तळ संध्याकाळपर्यंत भाविकांनी फुलून गेला होता.

यंदाच्या वर्षी योग्य नियोजन केल्यामुळे चंद्रभागा नदीत पुरेसे पाणी उपलब्ध आहे. यामुळे वारकऱ्यांनी स्नानासह नौका विहाराचाही आनंद लुटला. या वर्षी मंदिर समितीने महिलांसाठी २१ ठिकाणी ‘चेंजिंग रूम’ची सोय उपलब्ध करून दिली आहे.

मंदिर समितीने यंदाच्या वर्षी पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांसाठी अनेक सुविधा पुरविल्या आहेत. यामध्ये दर्शन रांगेत रबरी कार्पेट, मोफत अन्नदान, २४ तास वैद्यकीय सुविधा,चहा, स्वच्छ पाणी आदींचा समावेश केल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी गुरुवारी १८ ते २० तास लागत आहेत. पत्राशेड पासून पुढे साधारणपणे साडे तीन किलोमीटर दूरपर्यंत दर्शन रांग गेली आहे.

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. यंदा एकादशीला होणाऱ्या नित्य आणि पाद्यपूजा एकच होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. श्री विठ्ठलाची पूजा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले सपत्नीक करणार आहेत, तर रुक्मिणीची पूजा शहराच्या नगराध्यक्षा साधना नागेश भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 3:07 am

Web Title: 11 lakh devotees entered pandharpur city for ashadhi ekadashi zws 70
Next Stories
1 रत्नागिरी-सिंधुदुर्गात पावसाने सरासरी एक हजाराचा टप्पा ओलांडला
2 प्राणिसंग्रहालयातील सफारीचे शुक्लकाष्ठ कायम
3 साखर कारखान्यांकडे थकीत ‘एफआरपी’ फक्त ४ टक्के
Just Now!
X