वाडा: तालुक्यातील गांध्रे या गावातील ठाकरे पाडा येथील युगा अमोल ठाकरे ही सहा वर्षीय मुलीने आपल्या वाढदिवसानिमित्त आई-वडिलांसह नातेवाईकांकडून वाढदिवसाची भेट म्हणून गरजूंसाठी चक्क रक्ताची मागणी केली आणि तब्बल ३६ जणांनी तिची मागणी पूर्ण केली आहे.

रोजच्या बातम्यांमधून राज्यातील अनेक रुग्णालयांत रक्ताचा तुटवडा असल्याची माहिती युगाच्या ऐकण्यात आली होती.  या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजूंसाठी रक्त गोळा करण्याचा मनोदय तिने आपल्या वडिलांजवळ बोलून दाखवला. लहान वयातही मुलीला सुचलेली रक्तदान शिबिराची कल्पना वडील अमोल ठाकरे यांना आवडली. आणि मित्रांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. युगाने स्वत: नातेवाईक व वडिलांच्या मित्रांना फोन करून वाढदिवसानिमित्त रक्ताची भेट मागितली. आणि तब्बल ३६ जणांनी रक्तदान करून युगाची वाढदिवसानिमित्त सुचलेली इच्छा पूर्ण केली. शनिवारी (१० एप्रिल) रोजी संकलित करण्यात आलेल्या ३६ बाटल्या रक्त वामनराव ओक रक्तपेढी ठाणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.