पंढरपूर : आपल्या नातीबरोबर घरी खेळायला येणाऱ्या अकरा वर्षीय बालिकेवर एका ज्येष्ठ व्यक्तीने अत्याचार करण्याची घटना येथे घडली आहे. गजानन पोरे (वय ५२) असे या व्यक्तीचे नाव असून त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, की तालुक्यातील एक अकरा वर्षीय मुलगी तिच्या मैत्रिणीकडे खेळायला जात होती. तिच्या मैत्रिणीचे आजोबा असलेल्या पोरे यांनी या बालिकेवर अत्याचार केले. हे अत्याचार करत असताना त्याने पीडित बालिकेच्या तोंडावर चिकटपट्टी आणि डोळ्याला पट्टी बांधल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत पीडितेच्या आईने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचाराचा हा प्रकार तब्बल तीन वेळा झाला आहे.

या घटनेनंतर पोरे हा फरार झाला होता. त्याच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. तालुक्यातील तुंगत येथे तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावर पोलिसांनी मोठय़ा शिताफीने पोरे याला पकडले आहे. त्याच्या विरोधात लैंगिक अत्याचार, अनैसर्गिक अत्याचार, पोस्को कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.