राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील १११ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, उपकरणे, तपासण्या व स्वच्छतेसाठी आवश्यक पाणी या निकषांत अकार्यक्षम ठरल्याचे आरोग्य सेवांवर देखरेख व नियोजन प्रक्रियेअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. या प्रयोगशाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी अंतर्गत देखभाल करणारे पद निश्चित करणे, या संदर्भात गुणवत्ता राखण्यासाठी शासनाच्या धोरणात बदल तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञांची रिक्त पदे तातडीने भरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील १३ जिल्ह्य़ांमध्ये सध्या आरोग्य सेवांवर देखरेख व नियोजन प्रक्रि येअंतर्गत सामाजिक संघटनेच्या सहकार्याने अनेक उपक्रम सुरू आहेत. त्या अंतर्गत रायगड, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, चंद्रपूर, सोलापूर, पुणे, अमरावती, नाशिक, नंदुरबार, ठाणे व गडचिरोली येथील १२३ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संबंधित प्रयोगशाळांची पाहणी करण्यात आली. त्यात महत्वाच्या व नियमीत तपासण्या, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा व्यवस्थेबाबतची माहिती जाणून घेण्यात आली. या संदर्भातील अहवाल लघुसंदेश (एसएमएस) पध्दतीने मागविण्यात आला. त्यात राज्यातील १२३ पैकी केवळ १२ प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोग शाळांमध्ये समाधानकारक सोयी सुविधा असल्याचे पुढे आले आहे.
उर्वरीत १११ प्रयोगशाळांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. प्रयोगशाळेत एक तंत्रज्ञ उपस्थित असणे आवश्यक असतांना १२३ पैकी २५ प्राथमिक आरोग्य केंद्रात तंत्रज्ञ उपलब्ध नाहीत. २ केंद्रात तर हे पदच भरलेले नसल्याचे दिसून आले. ७३ प्रयोगशाळांमध्ये टी.बी.साठी आवश्यक थुंकीची तपासणी सारख्या नियमीत किंवा एचआयव्ही, एड्स आहे की नाही हे पाहण्यासाठी आवश्यक असलेली रक्त चाचणीच करता येत नाही. प्रयोगशाळेत आवश्यक असणारी कोलोरी मीटर, सुक्ष्मदर्शक, ग्लुकोमीटर उपकरणे ९१ उपकेंद्रात नाहीत किंवा असली तरी ती सध्या बंद आहेत. यामुळे रुग्णांना तपासणीसाठी ग्रामीण किंवा जिल्हा रुग्णालय गाठावे लागते. तसेच, प्रयोगशाळेतील दैनंदिन कामकाजासाठीआवश्यक रसायने, उपकरणांखेरीज महत्वपूर्ण भूमिका निभावणारे पाणी हे २२ टक्के रुग्णालयात उपलब्ध नाही. यामुळे रुग्णांच्या आजाराचे निदान, उपलब्ध उपकरणांची स्वच्छता आदी कामांत अडचणी येत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
रायगड, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळांची परिस्थिती गंभीर असून आदिवासीबहुल नंदुरबार, ठाणे, गडचिरोली जिल्ह्य़ातील प्रयोगशाळांमध्ये तपासणी, तंत्रज्ञांची उपलब्धता, अत्यावश्यक उपकरणे यांची परिस्थिती समाधानकारक आहे. तंत्रज्ञ तसेच स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयोगशाळांच्या सेवांची अंतर्गत देखरेख व जबाबदारी स्वीकारणारे पद निश्चित करावे, या संदर्भातील शासनाच्या धोरणात बदल तसेच रिक्त पदे भरावीत या त्रिसुत्रीवर प्रयोगशाळांचे काम होणे गरजेचे असल्याची शिफारस करण्यात आली आहे.