28 October 2020

News Flash

Coronavirus : तारापूर औद्योगिक वसाहतीला करोनाची लागण

दोन दिवसांत ११३ रुग्णांची नोंद

दोन दिवसांत ११३ रुग्णांची नोंद

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर/ बोईसर : औद्य्ोगिक वसाहतीलगतच्या गावांमध्ये गजबजलेल्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या कामगारांकडून सामाजिक अंतर पाळणे शक्य होत नसल्याने करोनाचा औद्य्ोगिक वसाहत परिसरात जलदगतीने फैलाव होत आहे. कामासाठी जाताना आणि प्रत्यक्ष काम करताना करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होत नसल्याने करोनाने बोईसर व परिसरात जणू धोक्याची पातळी ओलांडली आहे.

पालघर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण बोईसर परिसरातील आहेत. बोईसर व परिसरातील ग्रामपंचायतींमध्ये दोन दिवसांत ११३ रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी बोईसरमध्ये ८१ तर बुधवारी ३२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर बोईसर परिसरात मुंबई व उपनगरातून मोठय़ा प्रमाणात अधिकारी व मालकवर्ग दररोज प्रवास करत आहे. त्याच बरोबरीने मूळ गावाहून परतलेला परराज्यातील कामगार औद्य्ोगिक परिसरात चाळींमध्ये दाटीवाटीच्या वस्तीमध्ये वास्तव्य करत आहे. प्रत्यक्षात काम करताना तोंडावर मास्क बांधणे, सामाजिक अंतर पाळणे आणि इतर नियमांचे पालन होत नसल्याने करोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. हेच कामगार आपल्या घरी परतल्यावर एका घरात आठ-दहा कामगार एकत्रित राहत असल्याने आजाराचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरत आहेत. एका प्रख्यात इस्पात उद्योगात आजाराची चाचणी केली असता तब्बल आठ टक्के कामगारांना आजाराने ग्रासले असल्याचे आढळून आले आहे.

बोईसर, काटकरपाडा, खैरेपाडा, पास्थळ, सरावली, बेटेगाव, सालवड, कोलवडे, कुंभवली, पाम, टेंभी या गावांमध्ये औद्योगिक वसाहतीमधील कामगार वास्तव्य करीत असून गेल्या काही दिवसांपासून या भागात दररोज सुमारे १०० नवे रुग्ण दररोज आढळत आहेत. असे असताना जोखीम संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, लक्षणे असणाऱ्यांचा शोध घेऊन आवश्यक तपासणी करण्याचा दर मर्यादित राहिला आहे. एकंदरीत आजाराचा फैलाव वाढत चालला असून परिसरात ४० हजारहून अधिक लक्षणे नसलेले रुग्ण आजाराने बाधित असल्याची शक्यता खुद्द आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या भागात नगर परिषद अस्तित्वात नसल्याने ग्रामपंचायतीकडे मनुष्यबळ मर्यादित आहे. तसेच प्रतिजन तपासणी करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याने जलदगतीने व अधिक प्रमाणात तपासणी करण्यावर अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाने कांबळगाव येथे नव्याने विलगीकरण कक्ष सुरू केला असला तरीही लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी टिमा रुग्णालयातील रुग्णक्षमता वाढवण्याची मागणी पुढे येत आहे.

नियमांची पायमल्ली

कामावर जाणारे तसेच बाजारात येणारे कामगार व नागरिक अनेकदा तोंडावर मास्क वापरत नसल्याचे दिसून येत असून त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यरत नाही. प्रतिबंधात्मक क्षेत्रामधून नागरिकांचा वावर उघडपणे होत असल्याने व कामाच्या ठिकाणी करोना संसर्ग रोखण्यासाठी असलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याने आजाराचा जलदगतीने प्रसार होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 4:11 am

Web Title: 113 covid 19 patients registered at tarapur industrial estate zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 समाजमंदिरांतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे
2 Coronavirus  : पालघर तालुक्यात करोनाचा मोठा प्रादुर्भाव
3 मोखाडा आयटीआय येथे जपानी पद्धतीने वृक्षलागवड
Just Now!
X