उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत असून मंगळवारी आणखी ११५ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविलेल्या स्वॅबमधील ५६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणीतही आणखी ५९ जणं कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या २ हजार ७५९ वर पोहचली आहे. मंगळवारी करोनाशी लढताना दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ६९ वर पोहचली आहे. सध्या जिल्ह्यातील १ हजार ६५७ जणांवर उपचार सुरू असून १ हजाराहून अधिक नागरिकांना उपचारानंतर घरी सोडले आहे.

स्वॅब आणि रॅपिड चाचणीत उस्मानाबाद शहर व तालुक्यात २५, कळंब २६, तुळजापूर २, उमरगा १४, परंडा २७, भूम १४, लोहारा ४, वाशी ३ असे एकुण ११५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. स्वॅब चाचणीमध्ये उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, तर तालुक्यातील पळसप, येडशी, खामसवाडी, सारोळा येथे नवे रुग्ण आढळले आहेत. तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात एक तर वेताळ गल्ली येथे एक रुग्ण आढळला आहे.