अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या धडक कारवाईत धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे जुगार खेळताना माजी महापौरासह १२ जणांविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या छाप्यात स्थानिक गुन्हे शाखेने ३२ हजार २५० रुपये रोख, १२ मोटारसायकली आणि ११ भ्रमणध्वनी असा एकूण १० लाख ४४ हजार ४५० रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला.
पाळधी येथील जुगार अड्डय़ावरील छाप्यात जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे यांच्यासह दिनकर कोळी, कमरअली मोहम्मद, चेतन भोई, महेंद्र पाटील, पिंटू प्रजापती, शेख शब्बीर मोहम्मद, मनोहर चौधरी, किरण पिंजारी, एकनाथ पाटील, विनोद मराठे, मनोज आहुजा, युवराज कोळी, सतीश साळुंखे यांना अटक करण्यात आली. न्यायालयात उपस्थित केल्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोलाणे गावाजवळ तापी नदीपात्रालगत एका गावठी दारूच्या अड्डय़ावर छापा टाकून १९०० लिटर कच्चे रसायन, १०० ते १५० लिटर उकळलेले रसायन, ६५ लिटर गावठी दारू असा एकूण ४९ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. तसेच जिल्ह्य़ातील चाळीसगाव, मेहुणबारे, जळगाव शहर व तालुका, पहूर, अमळनेर, अडावद, चोपडा शहर, धरणगाव, एरंडोल, मारवड, भुसावळ शहर, मुक्ताईनगर, यावल, सावदा व बोदवड या ठिकाणीही अशा प्रकारचे छापे टाकण्यात येऊन ४४ संशयितांवर कारवाई करण्यात आली.