खरीप हंगामात एफओआर आणि एक्सचा गोंधळ उडाल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हा त्रास होऊ नये म्हणून राज्यासाठी १२ लाख टन युरिया आताच राखीव करून ठेवण्यात आला आहे. पंधरा दिवसानंतर खरीप हंगाम संपताच रब्बीच्या नियोजनाची तयारी कृषी आयुक्तालयाने सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना निमकोटेड युरिया बाजारमूल्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात भाषणातून केली होती. मात्र, राज्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना निमकोटेड युरिया मिळाला नाही. सोबतच एफओआरऐवजी एक्स युरियाची रॅक आल्याने आणखीच गोंधळ उडाला. परिणामी, शेतकऱ्यांना २९८ रुपयांची बॅग थेट ३५० रुपयात मिळाली. यात वाहतूक कंत्राटदारासोबतच कृफको, इफको, आरसीएफ, आयपीएल, कोरोमंडल, गोदावरी, पीपीएल या कंपनीचे प्रतिनिधी आणि संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी कारणीभूत आहेत. विदर्भात विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (व्हीसीएमफ)च्या गोंधळामुळे शेतकऱ्यांना प्रसंगी ४०० रुपये युरियासाठी मोजावे लागले.
या सर्व गोष्टींची गंभीर दखल पुण्याच्या कृषी आयुक्तालयाने घेतल्यानंतर खरीप हंगामासारखा गोंधळ रब्बी हंगामात होऊ नये म्हणून महाराष्ट्रासाठी १२ लाख मेट्रीक टन युरिया आतापासूनच राखून ठेवण्यात आलेला आहे. खरीप हंगाम संपायला अवघ्या १५ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर रब्बी हंगामाची कामे सुरू होतील. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने रब्बीच्या खतांचे नियोजन केले आहे. राज्यात आणि त्यातल्या त्यात विदर्भात खतांचा काळाबाजार आणि एफओआर व एक्सचे रॅकेट लक्षात घेऊन संबंधित एजन्सीला आतापासूनच तंबी देण्यात आलेली आहे. रब्बी हंगामात जर कुणी अशा प्रकारचा गोंधळ केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. रब्बीसाठी युरियाचे नियोजन करतांना विभागवार मागणीची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसारच हा युरिया पाठविण्यात येणार आहे. एखाद्या कंपनीने वा एजन्सीने गडबड केली, तर त्याचेवर दंडही ठोठावण्यात येणार आहे. १२ लाख मेट्रीक टन युरियापैकी ५० हजार मेट्रीक टन युरिया राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाचे सहायक संचालक कवडे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. यावर्षी चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्य़ात युरियाचा सर्वाधिक गोंधळ झाला. गडचिरोली जिल्ह्य़ात तर युरियाची मागणी होती तेव्हा तो मिळालाच नाही. मात्र, आता हंगामाच्या शेवटी तीन रॅक युरिया पाठविण्यात आलेला आहे. तसेच चंद्रपूरलाही मोठय़ा प्रमाणात युरिया पाठविला असल्याची माहिती त्यांनी दिली. चंद्रपूर व्हीसीएमएफच्या विरोधात अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात युरिया पाठवितांना बरीच काळजी घेतली जाणार असल्याचेही ते म्हणाले.