लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यत १२ नवे करोनाबाधित रुग्ण मंगळवारी आढळून आले आहेत. काल रॅपिड टेस्टमध्ये सकारात्मक आढळून आलेल्या ३२ रुग्णांचीही आज नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण रुग्ण संख्या २१८४ वर पोहोचली आहे. २५ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

जिल्हय़ात करोनाचा संसर्ग पसरतच आहे. शहरी भागाच्या तुलनेत आता ग्रामीण भागात रुग्ण वाढीचा वेग वाढला. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूही होत असतांना सुदैवाने आज मृत्यूची नोंद झाली नाही. दरम्यान, जिल्ह्यतील एकूण १८५ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १७३ अहवाल नकारात्मक, तर १२ अहवाल सकारात्मक आले आहेत. काल रात्री रॅपिड टेस्टमध्ये ३२ अहवाल सकारात्मक आले. त्याचाही समावेश एकूण रुग्ण संख्येत आज करण्यात आला आहे. आजपर्यंत एकूण १६८४३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १६३५४, फेरतपासणीचे १६१ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२८ नमुने होते. आजपर्यंत एकूण १६७६८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या १४७३७, तर सकारात्मक अहवाल रॅपिड टेस्टचे मिळून २१८४ आहेत. सध्या ३०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात १२ जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळीच्या अहवालातच ते आढळून आले असून त्यात पाच महिला व सात पुरुष आहेत. त्यातील तीन जण हे बारगणपूरा अकोट येथील, तीन जण बोरगाव मंजू, दोन जण रामनगर, तर अकोली जहागीर अकोट, जीएमसी, खैर मोहम्मद प्लॉट व जिल्हा कारागृह येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळी प्राप्त ७१ अहवालांत एकही सकारात्मक रुग्ण आढळला नाही. आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच, कोविड केअर केंद्रातून नऊ, मूर्तिजापूर येथून दोन, खासगी रुग्णालय व हॉटेल मिळून नऊ असे एकूण २५ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत १७७९ जण करोनामुक्त झाले आहेत.