13 July 2020

News Flash

फुलांच्या बहराचा औरंगाबाद पर्यटनाला हातभार

गुलाबाच्या १२० जाती, १२ हजार फुलांचे ताटवे, फुलांच्या भोवताली फिरण्यास प्रशस्त जागा अशा स्वरूपात औरंगाबादमध्ये गुलाब उद्यान उभे राहते आहे.

| February 18, 2015 01:53 am

औरंगाबाद शहरातील पर्यटनाला भविष्यात फुलांचा बहर हातभार लावू शकेल. याचे कारण गुलाबाच्या १२० जाती, १२ हजार फुलांचे ताटवे, फुलांच्या भोवताली फिरण्यास प्रशस्त जागा अशा स्वरूपात औरंगाबादमध्ये गुलाब उद्यान उभे राहते आहे. पर्यटन महामंडळाने या कामासाठी सुमारे ३ कोटी ५५ रुपये मंजूर केल्यानंतर फुलांच्या जाती शोधण्याचे काम सुरू आहे. याबरोबरच उद्यानाची आखणी गुलाबाच्या आकाराचीच हवी, असे प्रयत्न करण्यात आले आहेत. हे काम नजाकतीचे असल्याने फुलांच्या जाती शोधण्यास, त्याच्या संवर्धनासाठी खास सोय करण्यात येत असल्याची माहिती या प्रकल्पावर काम करणारे तज्ज्ञ प्रदीप देशपांडे यांनी दिली.
शहरातील मजनुहिल परिसरात रोझ गार्डन करण्याच्या प्रस्तावास पर्यटन विकास महामंडळाने परवानगी दिली. येणाऱ्या पर्यटकांसाठी शहरात काही जागा चांगल्या असाव्यात, असा त्यामागे उद्देश असतो. पर्यटनवाढीसाठी तब्बल २३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मागील सरकारने मंजूर केला होता. त्यातून गुलाब उद्यान ही संकल्पना पुढे आली. या उद्यान उभारणीची तयारी जोरदार सुरू आहे. शहरातील तापमानात वर्षभर कोणत्या फुलांचे ताटवे बहरतील, याचा अभ्यास केला गेला. सुमारे १२० गुलाबांच्या जातींची रोपे मिळविण्यात येणार आहेत. बंगळुरू, कोलकाता व पुणे येथून कलम आणले जाणार आहे. प्रत्येक मोसमात बहर येईल, अशा फुलांचे ताटवे येथे लावण्यात येणार आहेत. उद्यानात ४ हजार चौरस मीटर चालणे, हा अपूर्व आनंद असेल, कारण तो मार्ग गुलाबाच्या आकाराचाच असेल.
उद्यानासाठी ५० हजार लीटरच्या दोन पाण्याच्या टाक्या बसविण्यात येणार आहेत. पर्यटकांना काही क्षण विरंगुळा म्हणून थांबावेसे वाटेल, अशी रचना केली आहे. तथापि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे या कामाकडे फारसे लक्ष नाही. आयुक्त प्रकाश महाजन यांनी तर कामाचा आढावाही घेतला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2015 1:53 am

Web Title: 12 thousand flowers rose garden
टॅग Aurangabad
Next Stories
1 शिवरॅलीच्या स्वागतासाठी मुस्लीम बांधवांचा पुढाकार
2 पत्ता विचारून हल्लेखोरांनी पानसरेंवर झाडल्या गोळ्या
3 राज्यात टँकरच्या संख्येत यंदा पाचपट वाढ
Just Now!
X