18 February 2020

News Flash

सैन्य भरतीच्या आमिषाने १२ तरुणांची फसवणूक

अ‍ॅक्सिस बँकेचा १ लाख ५० हजार रुपयाचा धनादेश सिक्युरिटी म्हणून दिला.

(संग्रहित छायाचित्र)

४१ लाख ९० हजार रुपये लुबाडले

कराड : सैन्यामध्ये भरतीचे आमिष दाखवून फलटण येथील सचिन डांगे याने जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यांतील १२ तरुणांची ४१ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमोल गुलाब पाटील (२४, वाकडी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) या तरुणाने ही तक्रार दिली आहे.

पाटील हा फलटण येथील युवा लक्षवेद करिअर अ‍ॅकॅडमी येथे पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आला होता. याठिकाणी पाटील याने दीड वर्ष प्रशिक्षण घेत पुढे तो इथेच प्रशिक्षक म्हणून काम पाहू लागला. या अकादमीमध्ये सचिन बाळासो डांगे (रा. भाडळी, ता. फलटण) याच्याशी त्याची ओळख झाली. यावेळी डांगे याने माझी सैन्यात ओळख असून, कोणालाही सैन्य दलात भरती व्हायचे असेल तर मला सांगा पैसे भरून काम करू शकतो, असे सांगितले. त्यानंतर अमोल याने भाऊ प्रवीण याला सैन्यात भरती करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यासाठी सचिन डांगे याने ३ लाख २० हजार रुपयांची मागणी केली.

अमोल पाटील याने घरातील लोकांशी चर्चा केली आणि पैसे देण्याचे ठरले. १८ नोव्हेंबर २०१८ रोजी डांगे याने जेजुरी येथील एका हॉटेलमध्ये अमोल पाटील यास बोलावले. याठिकाणी अमोल याचे वडील गुलाब पाटील यांनी सचिन डांगे याला १ लाख ५० हजार रुपये रोख स्वरूपात दिले. त्या वेळी डांगे याने त्याच्या अ‍ॅक्सिस बँकेचा १ लाख ५० हजार रुपयाचा धनादेश सिक्युरिटी म्हणून दिला.

डांगे याने अशाच प्रकारे अमोल पाटील याच्या मध्यस्थीने धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यांतील गरीब आणि गरजू मुलांकडून प्रत्येकी १ लाख ५० हजार रूपये घेतले. त्यामध्ये गणेश सुरेश पाटील, हर्षल पाटील (दोघेही रा. तराळी, ता. शिरपूर, जि. धुळे), राहुल पाटील (रा. एकरूखे, ता. अंमळनेर, जि. जळगाव), गणेश निकम, प्रकाश कुमावत (दोघेही रा. मुनखेडे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), सागर मुसाळे, संदीप साळे (रा. लखमापूर, ता. सटाणा, जि. नाशिक), शुभम गोरख पाटील (रा. वाकडी), किरण कदम (रा. चंभाडी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), करण कैकाडी (रा. म्हसवे, ता. पारोळी, जि. जळगाव), जालिंदर आण्णा राजनोर (रा. जळगाव चोंडी, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांचा फसवणूक झालेल्यांमध्ये समावेश आहे.

डांगे याने २८ जानेवारी २०१९, नोव्हेंबर २०१९ आणि १५ जानेवारी २०२० अशा भरतीच्या तारखा दिल्या होत्या. मात्र, यापैकी कोणत्याच तारखांना भरतीबाबत पत्र आले नाही. नियुक्ती पत्र देतो म्हणून आणखी पैसे पत्नीच्या बँक खात्यावर भरण्यास डांगे याने सांगितले. त्यानंतरही पत्र न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे या युवकांच्या लक्षात आले. त्यामुळे अमोल पाटील यांनी सचिन डांगे याच्याविरोधात फलटण शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आणखी काही मुलांची फसवणूक झाली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस फौजदार दळवी हे करत आहेत.

First Published on January 28, 2020 3:20 am

Web Title: 12 youths cheated in the name of army recruitment zws 70
Next Stories
1 वाडय़ातील दास्तान डेपोवरील छापा बोगस
2 पालघरच्या तरुणाची जर्मनीत छाप
3 स्फोटामुळे वीजनिर्मिती बंद
Just Now!
X