रायगडकर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तब्बल १२२ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या २,४१८ वर पोहोचली आहे. दिवसभरात ३१ जणांनी करोनावर मात केली आहे. तर रविवारी उपचारांदरम्यान तिघांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात १२२ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील ६२, पनवेल ग्रामीणमधील २२, उरणमधील ४, खालापूर ३, पेण ९, अलिबाग ३, रोहा १०, महाड ५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील २ तर अलिबाग येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ६,६२० जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ४,१०३ जणांचे अहवाल नकारात्मक आले. २,४१८ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ९९ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. १,५८२ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ७३८ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ४०३, पनवेल ग्रामीण हद्दीतील १२४, उरणमधील ३२, खालापूर ७, कर्जत २२, पेण ३८, अलिबाग ४०, मुरुड ३, माणगाव १५, रोहा ११, म्हसळा ११, महाड २१, पोलादपूरमधील ८ करोना बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत ९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या ५८ हजार ५२४ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. करोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. सुरुवातीला पनवेल आणि उरण तालुक्यांपुरता मार्यादित असलेला करोना आता अलिबाग, पेण, माणगाव, रोहा, महाड तालुक्यात वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे.