लष्कराच्या यांत्रिकी पायदळ केंद्रात (एमआयआरसी) कठोर शारीरिक व मानसिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १२९ जवानांची तुकडी आज लष्करात दाखल झाली. त्यांच्या दीक्षान्त समारंभानिमित्त या जवानांना देशसेवा व देशनिष्ठेची शपथ देण्यात आली. हे जवान आता लष्कराच्या विविध विभागांत शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणासाठी दाखल होतील.
एमआयआरसीच्या अखौरा कवायत मैदानावर झालेल्या शानदार समारंभात यंदा जवानांनी थायलंड लष्कराची ‘मॅजिक ड्रील’ सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. जवानांच्या तुकडीने संचलन करत, लष्कराच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व कर्नल ऑफ मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल फिलीप कम्पोज यांना मानवंदना दिली. फिलीप कम्पोज यांनी कवायतीचे निरीक्षण करत जवानांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल कौतुक केले. प्रामाणिकपणा व समर्पण भावनेने देशसेवा करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.
मेजर व्ही. डी. चाको यांनी जवानांना देशसेवेची शपथ दिली. विविध धर्माच्या धर्मगुरूंनीही जवानांना शपथ दिली. जवान विजय मूर्ती याने जनरल सुंदरजी सुवर्णपदक, जवान दीपकसिंह रौतेला याने रौप्यपदक व जवान लवप्रीतसिंह याने कांस्यपदक पटकावले. ले. जनरल फिलीप कम्पोज यांच्या हस्ते जवानांना ते प्रदान करण्यात आले. समारंभास केंद्रातील अधिकारी, माजी अधिकारी, जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.