गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात पोलिसांनी सुमारे १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले असून यामध्ये जहाल नक्षलवादी साईनाथ आणि सिनूचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भामरागड तालुका हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीनंतर जंगलात  कोम्बिंग ऑपरेशन चालू करण्यात आले आहे. ताडगाव जंगलात नक्षलवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. यापूर्वी तीन एप्रिलला पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले होते. यामध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता.

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात अभियान चालू केले आहे. या भागात ग्रामस्थ आणि नक्षलींमध्ये वारंवार संघर्ष होत असल्याचे वृत्त येत असते. दरम्यान, देशात नक्षलवाद्यांच्या कुरापती कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर नक्षलवादी परिसर ही घटला आहे. देशातील १२६ जिल्हे नक्षलप्रभावीत होते. त्यातील ४४ जिल्हे हे नक्षलमुक्त झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु, आठ नवीन जिल्हे नक्षल प्रभावित झाल्याचेही समोर आले आहे. सर्वाधिक नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या घटून ३५ वरून ३० वर आली आहे. बिहार आणि झारखंडमधील पाच जिल्हे अति नक्षल प्रभावित श्रेणीतून मुक्त झाले आहेत. मागील पंधरवड्यात झारखंडमधील लत्तेहार जिल्ह्यात सेरेनडागच्या जंगलात सुरक्षा दलाने पाच नक्षलवाद्यांना ठार केले होते. तसेच घटनास्थळाहून दोन एके ४७ रायफल्स, एक इन्सास रायफल जप्त केली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 maoists died in encounter with police in bhamragad taluka tadgaon forest gadchiroli
First published on: 22-04-2018 at 13:28 IST