जिल्ह्य़ातील करोनाबाधितांच्या संख्येत नव्याने १३ ची भर पडली आहे. या रूग्णांमध्ये भडगावचे १२, तर भुसावळ येथील एकाचा समावेश आहे. भडगावची रूग्ण संख्या आता २३ झाली आहे.

सोमवारी सकाळी प्राप्त ४८ नमुना तपासणी अहवालांपैकी ३५ नकारात्मक, तर १३ अहवाल सकारात्मक आले. जिल्ह्य़ातील करोना बाधित रूग्णांची संख्या २७९ झाली आहे. अमळनेर, भुसावळ आणि जळगाव पाठोपाठ आता भडगावच्या रूग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. करोनापासून दूर राहिलेल्या इतर तालुक्यांमध्येही आता या आजाराने शिरकाव केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. चाळीसगाव तालुक्यात करोनाचा एकही रूग्ण नव्हता. परंतु, तालुक्यातील जामडी येथील महिला करोनाबाधित आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या जिल्ह्य़ात १५६ करोनाबाधितांवर उपचार सुरू असून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्य़ात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ६६ झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र महानगरपालिका हद्दीत २४ असून जळगाव ग्रामीण एक, अमळनेर १०, भुसावळ १३, धरणगाव एक, चोपडा चार, पाचोरा नऊ, मुक्ताईनगर एक, भडगाव दोन, यावल एक अशी संख्या आहे.

जळगाव महापालिका क्षेत्रात मेहरूण, सालारनगर, जोशीपेठ, समतानगर, समर्थ कॉलनी, नेहरूनगर, पवननगर, अक्सानगर, गोपालपुरा, खंडेरावनगर, सिंधी कॉलनी, हायवे दर्शन कॉलनी, शाहुनगर, प्रतापनगर, ओंकारनगर, गुलमोहर महाबळ, श्रीधरनगर, हरिविठ्ठलनगर, श्रीरामनगर, आदर्शनगर, गेंदालाल मिल, गांधी नगर, गणेशवाडी, पिंप्राळा हुडको अशी प्रतिबंधित क्षेत्रे आहेत.