लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : वाशीम जिल्ह्यामध्ये २४ तासांत १३ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. सध्या दाखल रुग्ण संख्या ५५ असून, एकूण रुग्ण संख्या ६७ झाली आहे. वाशीम जिल्ह्यात काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील सात व्यक्तींना करोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये कारंजा लाड येथील ३८ व ४८ वर्षीय महिला, ३३ व ५८ वर्षीय पुरुष व दोन सहा वर्षीय मुली अशा एकूण सहा जणांचा समावेश आहे. हे सर्वजण कारंजा लाड येथील गांधी चौक येथील करोना बाधितांच्या नजीकच्या संपर्कातील आहेत. वाशीम तालुक्यातील हिवरा रोहिला येथील २९ वर्षीय युवक सुद्धा करोनाबाधित असल्याचे निदान झाले. हा युवक मुंबई विरार येथून आला असून त्याठिकाणी करोनाबाधिताच्या संपर्कात आला होता.

आज दुपारी व सायंकाळी आलेल्या अहवालानुसार आणखी सहा जणांना बाधा असल्याचे स्पष्ट झाले. दुपारी प्राप्त अहवालानुसार मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील एकाच कुटुंबातील ४१ वर्षीय पुरुष व १३ वर्षीय मुलाचा अहवाल सकारात्मक आला आहे. हे कुटुंब डोंबिवली, मुंबई येथून आले होते. या कुटुंबातील चार व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील एका ३० वर्षीय महिलेचा अहवाल सकारात्मक आला असून ही महिला करोनाबाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहे. सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कारंजा लाड माळीपूरा येथील तीन जणांचा विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये दोन ३६ वर्षीय पुरुष व एका २५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. हे सर्वजण कारंजा शहरातील करोनाबाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहेत.