ठाणे, कल्याण, पालघरमधील वीजग्राहकांना फटका

संजय बापट, लोकसत्ता 

अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून, ३१ जण जखमी झाले आहेत. चक्रीवादळाचा कोकणातील ३,५७१ गावांतील दोन लाख २० हजार जणांना फटका बसला असून, आठ हजार ८३० हेक्टरवरील शेतपिके  आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पुणे विभागातही घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

दोन राज्यांत धुमाकू ळ घालणाऱ्या तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात जास्त नुकसान झाले. गेल्या वर्षी जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळात कोकणला मोठा फटका बसला होता. त्या धक्क्यातून कोकण सावरत असतानाच आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने पावसाळ्याच्या तोंडावर हजारो कुटुंबांना बेघर केले असून, फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान के ले आहे.

राज्य सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ांना बसला आहे. चक्रीवादळात कोकण विभागातील सात जिल्ह्य़ांतील तीन हजार ५७१ गावांतील दोन लाख २० हजार लोकांना फटका बसला आहे. आतापर्यंत एकूण १३ (पान २ वर) (पान १ वरून) मृतांमध्ये रायगड चार तर ठाणे आणि पालघरमधील प्रत्येकी तीन आणि सिंधुदुर्गमधील दोघांचा समावेश आहे. वादळामुळे सरकारी इमारती, शाळा- महाविद्यालयांच्या ४० इमारतींचे मोठय़ा प्रमाणात, तर २४५ इमारतींचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ३९ इमारतींचे पूर्णत:, तर ६३ अंशत: नुकसान झाले आहे. रायगडमध्ये ६६ तर रत्नागिरीत ५३ इमारतींचे अंशत: नुकसान झाले. कोकणात एकू ण ४१ घरे जमीनदोस्त झाली असून १२ हजार ६८२ घरांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये रायगडमधील सहा हजार, सिंधुदुर्गातील तीन हजार ७२६, रत्नागिरी १८६३ आणि ठाणे ५६० घरांचा समावेश आहे.

मुंबई उपनगरातील २० हजार १५८ लोकांना चक्रीवादळाचा फटका बसला असून, घरावरील पत्रे उडून जाणे, घरात पाणी घुसणे, घरांवर झाड पडून नुकसान होणे अशा घटना घडल्या आहेत. रायगडमधील एक लाख ७३ हजार, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील १५ हजार ६४४ लोकांना फटका बसला आहे. वादळात झाडे उन्मळून पडणे किंवा फांद्या तुटून पडण्याच्या पाच हजार घटनांची नोंद झाली आहे.

राज्यातील वीजयंत्रणा कोलमडली

* कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही वीजपुरवठा यंत्रणा कोलमडली. ल्ल रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, पुण्यासह राज्यातील १०,७५२ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला.

* चार हजार गावे आणि १२ लाख वीजग्राहक अद्याप अंधारात.

ठाणे जिल्ह्य़ात सर्वाधिक हानी

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ठाणे शहर आणि जिल्ह्य़ाला बसला. त्यात सात लाख ८५ हजार ५१९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यापैकी ५ लाख ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी सायंकाळपर्यंत सुरळीत करण्यात महावितरणला यश आले असले तरी सव्वा दोन लाखांहून अधिक वीजग्राहक अद्याप अंधारात आहेत. चक्रीवादळाने अनेक रोहित्रांचे नुकसान झाल्याने कल्याणमध्येही सोमवारपासून वीजपुरवठा खंडित होता. अनेक ठिकाणी वीजपुरवठा मंगळवारी दुपारी पूर्ववत झाला. कल्याण पूर्वेतील काही भागांत मंगळवारी सायंकाळी ६ वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला. दोन दिवस वीज खंडित झाल्याने टाळेबंदीमुळे घरून काम करणाऱ्यांचे हाल झाले.  विजेअभावी पाणीपुरवठाही विस्कळीत झाला.

पालघर दुसऱ्या दिवशीही अंधारात

पालघर : चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरू न झाल्याने दुसऱ्या दिवशीही (मंगळवार) पालघर जिल्ह्य़ातील अधिकांश भाग अंधारात होता. विजेअभावी पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. भ्रमणध्वनी यंत्रणा कोलमडली आहे. करोना रुग्णालयांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. वसई-विरार महापालिका तसेच पालघर शहरासह १९ गावांच्या पाणीयोजनांचा वीजपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.