मनीषनगरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला जाळल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ती ९५ टक्के जळलेल्या स्थितीत आढळून आली असून तिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेतील आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  
मनीषनगरात मोलमजुरी करणाऱ्या एका कुटुंबातील ही मुलगी गुरुवारपासून बेपत्ता होती. तिचे वडील चौकीदार आणि आई घरकाम करते. मुलगी घरी नसल्याचे कळताच तिच्या वडिलांनी सायंकाळी सात वाजेपर्यंत तिचा परिसरात शोध घेतला व अखेर सायंकाळी सोनेगाव पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी रात्रभर विविध भागात मुलीचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. सकाळी आठ वाजताच्या सुमारास मुधकर उईके यांना इमारतीत काही जळत असल्याचे दिसले आणि रडण्याचा आवाज आला. त्यांना मुलगी जळलेल्या अवस्थेत पडल्याचे दिसून आले.  त्यांनी सोनेगाव पोलीस ठाण्याला माहिती दिल्यावर सहायक पोलीस आयुक्त बाळकृष्ण पौनीकर, पोलीस उपायुक्त कैलाश कणसे घटनास्थळी आले. त्या मुलीच्या आईला आणि वडिलांना या घटनेची माहिती देण्यात आली. ते घटनास्थळी आल्यावर तिची ओळख पटली. मुलीला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे.  या मुलीवररात्रभर अत्याचार करून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय असून त्यात तीन ते चारजणांचा समावेश असण्याची शक्यता आहे.