21 October 2019

News Flash

दशकभरात मराठवाडय़ात वर्षांला सरासरी तेराशे पाणी टॅँकर!

गेल्या नऊ वर्षांत एकही वर्ष असे नाही, की ज्यामध्ये मराठवाडय़ात टँकर चालू ठेवावे लागले नाहीत

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

गेल्या दशकभरात मराठवाडय़ातील आठ जिल्हय़ात दरवर्षी सरासरी १ हजार ३२४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. यामध्ये सर्वाधिक टँकर २०१५ मध्ये चार हजार १५ एवढे होते. तर सर्वात कमी टँकरची संख्या २०१७ मध्ये केवळ २१८ एवढी होती. या वर्षी पुन्हा टँकरचा आकडा तीन हजाराची संख्या पार करीत असल्याची आकडेवारी आहे. सध्या ३ हजार ६८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. आता धरणे कोरडी पडू लागली आहेत. गावोगावी किमान प्यायचे पाणी द्या म्हणून आंदोलने तीव्र होत आहेत. या काळात मागील दहा वर्षांतील टँकरची आकडेवारी मराठवाडय़ातील भीषणता दाखविणारी आहे.

गेल्या नऊ वर्षांत एकही वर्ष असे नाही, की ज्यामध्ये मराठवाडय़ात टँकर चालू ठेवावे लागले नाहीत. आठ जिल्हय़ांचा हा प्रदेश दिवसेंदिवस कोरडा पडत असल्याचे पावसाच्या आकडेवारीवरुन तर स्पष्ट होतेच, पण आता टँकरची संख्याही हा कोरडेपणा मोजण्याचा निकष बनत चालला आहे. पावसाच्या आकडेवारीमध्येही कमालीचे अंतर असते. त्या सरासरीच्या जोरावर अनेक योजना आखल्या जातात. टँकर लॉबीचे लाड जरी लक्षात घेतले तरी टँकरची आकडेवारीही आता कोरडेपणा मोजण्याचा निकष मानता येईल, अशी स्थिती आहे. २०१२ मध्ये पडलेल्या दुष्काळामध्ये टँकरची संख्या वाढत गेली. तत्पूर्वी २०१० व २०११ मध्ये अनुक्रमे ४१२, ४७८ टँकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यानंतर टँकरची संख्या नेहमी हजारी गाठणारी दिसून येत आहे. या वर्षी टँकरचे केंद्रबिंदू बदलले गेले. जालना जिल्हय़ातील भीषणता नंतर लातूरकडे सरकली आणि आता बीड व औरंगाबाद जिल्हय़ातील पाणीटंचाईने गंभीर रुप धारण केले आहे. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी  विहिरीत उतरत जीवघेणा खेळ करावा लागतो. या वर्षी टँकरच्या संख्येत वाढ करण्यासाठी टँकर लॉबीने सुरुवातीच्या टप्प्यात बरेच प्रयत्न केले. ‘टँकर आवडे सर्वाना’ या शीर्षकासह ‘लोकसत्ता’ मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यातील काही दोष दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर विभागीय आयुक्तपदी सुनील केंद्रेकर यांची बदली झाल्यानंतर टँकरच्या फेऱ्यातील अनेक घोळ दूर होऊ लागले. आता तीव्र टंचाईमुळे ही संख्या वाढू लागली आहे. मात्र, या वर्षी टँकरच्या पाण्याच्या खर्चाचा आलेख चांगलाच उंचावलेला असेल कारण टँकरचे दर राज्य सरकारनेच वाढवलेले आहेत.

कोणत्या वर्षांत टँकरने हजारी पार केली?

गेल्या नऊ वर्षांत २०१२ मध्ये १३०७ टँकर लागले होते. त्यानंतर लगेच पुढच्या वर्षी म्हणजे २०१३ मध्ये टंचाईची तीव्रता वाढली. तेव्हा २ हजार १३६ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. सर्वाधिक पाणीटंचाई जाणवली ती २०१५ मध्ये, तेव्हा ४०१५ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. २०१६ व २०१८ मध्ये अनुक्रमे ९४० व ९७३ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. केवळ २०१०, २०११ आणि २०१७ या वर्षांत टँकरची संख्या तुलनेने कमी होती. त्यातही सर्वात कमी टँकर लागले ते २०१७ मध्ये. त्यावर्षी टँकर संख्या २१८ एवढी होती.

First Published on May 18, 2019 1:40 am

Web Title: 1300 water tankers annually in marathwada