‘हेलिकॉप्टर’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या चतुरांच्या (ड्रॅगनफ्लाय) १३४ जाती डॉ. आशिष टिपले आणि पंकज कोपर्डे यांनी महाराष्ट्रभर सलग आठ वष्रे केलेल्या अभ्यासातून आढळून आल्या आहेत. या विषयीचा त्यांचा शोधनिबंध नुकताच ‘जर्नल ऑफ इन्सेक्ट सायन्स’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात mh06प्रकाशित झाला. डॉ. आशिष टिपले हे सेलू येथील विद्याभारती कॉलेजमध्ये प्राणीशास्त्र विभागप्रमुख आहेत, तर पंकज कोपर्डे हे सलीम अली पक्षीविज्ञान आणि प्रकृतीशास्त्र केंद्रात डॉक्टरेट करीत आहेत.
या शोधनिबंधासाठी टिपले आणि कोपर्डे यांनी महाराष्ट्रातील विविध नद्या, तळी-तलाव आणि जंगलात संशोधन केले. यापूर्वीच्या झुऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियामधील आणि इतर संशोधकांनी १९०० ते २०१२ मध्ये केलेल्या अभ्यासात महाराष्ट्रातून ९९ जातींची नोंद केली गेली होती. टिपले आणि कोपर्डे यांनी २००६-२०१४ मध्ये केलेल्या संशोधनातून आणि इतर स्त्रोतांकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे यापूर्वीच्या महाराष्ट्राच्या चतुरांच्या यादीमध्ये ३३ अधिक जातींची नोंद करण्यात आली. त्यांच्या अभ्यासादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील पश्चिम घाट, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश, उत्तर महाराष्ट्राच्या भागात संशोधन केले. या अभ्यासादरम्यान त्यांना पश्चिम घाटातील काही प्रदेशनिष्ठ जाती आढळून आल्या. चतुर (ड्रॅगनफ्लाय) आणि टाचण्यांचा (डॅम्सेलफ्लाय) ओडोनाटा या कीटकांच्या प्रजातींमध्ये समावेश होतो. पाणी हे या कीटकांच्या जीवनचक्राचा अविभाज्य भाग असतो. अधिवासात झालेल्या बदलांची परिणती त्यांच्या संख्येवर होते. त्यामुळे या कीटकांना अधिवासाच्या स्थितीचे दर्शक mh05म्हणूनही ओळखले जाते. या कीटकांच्या कोणत्या प्रजाती कुठे आढळतात आणि का, याचा अभ्यास डॉ. टिपले आणि कोपर्डे यांनी केला. महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती आणि हवामानामुळे चतुर आणि टाचण्यांसाठी पोषक अधिवास महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील इतर बऱ्याच भागातून(जेथे संशोधन होऊ शकले नाही) तेथे अजूनही काही जातींचा अधिवास असू शकतो. पेंच, बोर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प फक्त वाघांसाठीच नाही, तर चतुरांसाठीसुद्धा फार महत्त्वाचे आहेत. १३४ जातींपैकी ८४ जाती विदर्भात आढळून आल्या आहेत. पश्चिम घाटात बऱ्याच प्रदेशनिष्ठ प्रजाती आढळल्या. यावरून मध्य-भारत, विदर्भ, पश्चिम घाट यांचे भौगोलिक महत्त्व कळून येते.
या अभ्यासादरम्यान तांत्रिक अडचणींमुळे बऱ्याच प्रदेशात संशोधन करता आले नाही. जर पद्धतशीरपणे महाराष्ट्रभर अभ्यास केला गेला तर या प्रकाशित यादीत आणखी काही बदल होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चिंतेची बाब म्हणजे, चतुर आणि टाचण्या यांचे जीवनचक्र पाण्यावर अवलंबून असल्यामुळे mh07प्रदूषित पाण्याचा धोका त्यांना लगेच पोहोचतो. आमच्या तसेच पूर्वीच्या काही अभ्यासात काही प्रजाती (उदा. मलबार टोरण्ट डार्ट, कूर्ग बांबूटेल, ब्ल्यू हॉकटेल) या फक्त घनदाट जंगलातील ओढय़ांमध्येच आढळून आल्या. शहरांमधल्या प्रदूषित तळे-नद्यांमध्ये थोडय़ाच प्रजाती (उदा. डिच ज्वेल, सेनेगल गोल्डन डार्टलेट) आढळल्या. जर या प्रजातींचे संवर्धन करायचे असेल तर त्यांचा अधिवास जपणे हे फार महत्त्वाचे आहे. या अभ्यासादरम्यान आम्हाला ‘ड्रॅगनफ्लायइंडिया’ या फेसग्रुपचा बराच उपयोग झाला. आम्ही या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर आमच्या संशोधनात केला. या साईटवरून हजारो लोक विविध ठिकाणांहून चतुरांचे फोटो आम्हाला पाठवून माहितीचे आदानप्रदान करतात. अशा साईट्स जर काळजीपूर्वक हाताळल्या तर बरीच माहिती मिळू शकते आणि त्याचा वापर संशोधनासाठी होऊ शकतो, अशी माहिती पंकज कोपर्डे यांनी दिली.