देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धे असलेल्या पोलिसांना देखील करोनाचा संसर्ग होत आहे. मागील २४ तासांत राज्यातील १३८ पोलीस करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, तर तिघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरनाबाधित पोलिसा कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आता ८ हजार ७२२ वर पोहचली असून, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ९७ झाली आहे. राज्यातील एकूण ८ हजार ७२२ करोनाबाधित पोलिसांपैकी आतापर्यंत ६ हजार ६७० पोलिसांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर, सध्या १ हजार ९५५ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

करोना संकटावर मात करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व करोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या करोना योद्ध्यांना करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा- बीडमधील हलगर्जीपणा; करोनाबाधित पोलिसाची लावली ड्यूटी, त्यानंतर …

करोनाचं संकट दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी आणखी गंभीर होताना दिसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या पहिल्या दहा देशांच्या तुलनेत भारतात करोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. इतकंच नाही तर दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येतही मागील काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. देशात सातत्यानं ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून, देशातील ज्या राज्यात ही संख्या जास्त आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

आणखी वाचा- देशभरात २४ तासांत ४७ हजार ७०४ नवे करोना पॉझिटिव्ह; ६५४ जणांचा मृत्यू

करोनाचा उद्रेक झालेल्या देशांच्या यादीत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकांवर आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ४७ हजार ७०४ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ६५४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १४ लाख ८३ हजार १५७ वर पोहचली आहे. देशभरातील एकूण १४ लाख ८३ हजार १५७ करोनाबाधितांमध्ये ४ लाख ९६ हजार ९८८ अॅक्टिव्ह रुग्ण, उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेले ९ लाख ५२ हजार ७४४ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३३ हजार ४२५ जणांच्या संख्येचा समावेश आहे.