सोलापूर शहरात आज ७२ नवीन करोनाबाधित रूग्ण सापडले. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला. जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाचा कहर सुरू असून आज एकाच दिवशी १३ बळी गेले तर ४६२ नव्या बाधित रूग्णांची भर पडली. करोनाचा कहर सुरू असतानाच मंगळवेढा येथे एका करोनाबाधित रूग्णाला पुढील उपचाराकरिता सोलापूरला हलविण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

शहरात एकूण बाधित रूग्णसंख्या ७ हजार ३२ तर मृतांची संख्या ४७७ झाली आहे. तर करोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या ५ हजार  ८७० झाली आहे. मात्र याउलट जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून, आतापर्यंत रूग्णसंख्या १३ हजार ६७२ वर पोहोचली आहे. तर, मृतांचा आकडाही ३९५ वर गेला आहे. तेथील करोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या ९ हजार २९४ इतकी आहे.

आज नव्याने सापडलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक १०९ रूग्ण माढा तालुक्यातील आहेत. तर दोन रूग्ण दगावले आहेत. बार्शीत तीन रूग्णांचा मृत्यू झाला असून, नव्याने ७६ बाधित रूग्ण सापडले आहेत. पंढरपूर येथेही ८७ नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर करमाळा येथे ३४ नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना तेथील वैद्यकीय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथे राहणाऱ्या एका ४० वर्षाच्या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मंगळवेढा येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती बिघडल्यामुळे त्यास सोलापुरात हलविण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. मात्र सोलापूरला रूग्ण हलविण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. शेवटी तासाभरानंतर खासगी वाहनाने रूग्णाला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृतदेह गावाकडे नेत असताना करोनाचा अहवाल पाॕझिटिव्ह आल्यामुळे मृतदेह गावाकडे न नेता पुन्हा मंगळवेढा येथे  नेण्यात आला आला.