सोलापूर : बार्शी तालुक्यातील वैराग येथे अज्ञात चोरटय़ांनी सराफी दुकान फोडून १३ किलो ८०० ग्रॅम चांदी आणि ११० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे १३ लाख २९ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला. वैराग पोलीस ठाण्यात या गुन्ह्यची नोंद झाली आहे.

बार्शी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वैराग येथे विजय चंद्रकांत गोवर्धन (वय ६१) यांचे मे. चंद्रकांत गोविंद गोवर्धन या नावाची सराफी पेढी आहे.

सायंकाळी नेहमीप्रमाणे गोवर्धन हे दुकान बंद करून घरी गेले. परंतु त्यानंतर पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या दुकानाचे लोखंडी ग्रील तोडले आणि लाकडी दरवाजाचा कुलूप कोयंडा तोडून आत प्रवेश केला. दोन किलो ६०० ग्रॅम वजनाचे वजनाने चांदीचे जोडवे, सहा किलो ४०० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण, चार किलो ८०० ग्रॅम वजनाचे चांदीचे ताम्हण, फूलपात्र, ग्लास, वाटी असे साहित्य चोरटय़ांच्या हाती लागले.

तसेच सोन्याची मोहनमाळ, दोन गंठण, अंगठी हे दागिने आणि ८२ हजारांची रोकड आदी ऐवजही चोरटय़ांनी लांबविला. पहाटे साडेपाचनंतर गोवर्धन यांची सराफी पेढी फोडल्याचे आढळून आले. तेव्हा गोवर्धन यांनी तत्काळ वैराग पोलीस ठाण्याशी संपर्क साधून फिर्याद नोंदविली.

आश्चर्य म्हणजे काही वर्षांपूर्वी हीच सराफी पेढी चोरटय़ांनी दोन वेळा फोडली होती. यात लाखोंचा ऐवज चोरून नेला होता. त्या दोन्ही गुन्ह्यंची उकल अद्यापि झाली नसतानाच आता पुन्हा तिसऱ्यांदा गोवर्धन यांची सराफी पेढी चोरटय़ांनी फोडल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.